विद्यामान आ. बालदी यांचे दुर्लक्ष
। उरण । वार्ताहर ।
जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर जल’ या संकल्पनेखाली केंद्र सरकारने 2024 पर्यंत देशातील सर्व ग्रामीण भागात राहणार्या कुटुंबांना नळ योजनेद्वारे पुरेसे व सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी जलजीवन मिशन सुरू केले होते. मात्र, उरण तालुक्यातील खोपटे गावांमध्ये मात्र हे काम ठेकेदाराच्या हलगर्जीपणामूळे संथ गतीने होत आहे. त्यामुळे मुख्य जलवाहिनीचे काम अपूर्ण असल्याने खोपटे गावात पाणी टंचाई सुरू आहे. त्यामुळे, मुख्य पाईप लाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी खोपटे ग्रामस्थ करीत आहेत.
उरण तालुक्यातील खोपटे गावात जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर जल’ या योजनेच्या कामात कंत्राटदाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चालढकल करण्यात येत आहे. जलजीवन मिशन अंतर्गत खोपटे ते चिरनेर गावापर्यंत अपूर्ण असलेल्या पाईप लाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी खोपटे गावातील ग्रामस्थ करत आहेत. हे काम पूर्ण न झाल्यामुळे खोपटे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. सातपाड्यांनी वसलेल्या या गावात जवळपास एक दिवसाआड एक तासासाठी पाणी येत आहे. त्यामुळे या गावात पाणीटंचाई पाचवीलाच पुजलेली आहे, असे गुहिणी कडून संबोधित केले जात आहे.
2021 ते 2022 रोजी जलजीवन मिशन अंतर्गत खोपटे ते चिरनेर या पाईप लाईनला मुख्य हेटवणे धरणाच्या पाईप लाईनला जोडण्याचे काम मंजूर झाले होते. मे 2023 रोजी या जलजीवन मिशन अंतर्गत मुख्य पाईपलाईनच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती. मात्र, संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अजूनही हे काम पूर्ण झालेले नाही. कंत्राटदार देखील हे काम पूर्ण करण्यास कोणत्याही प्रकारचे स्वारस्व दाखवत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे गावात पाणीटंचाईची समस्या डोके वर काढत आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधी आणि आमदार महेश बालदी हे आवाज उठवित नसल्याचे सध्या खोपटा गावातील ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.