पुनर्वसनाचा प्रश्न 40 वर्षांपासून प्रलंबित; जेएनपीए प्रशासन भवनासमोर करणार उपोषण
| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा (शेवा कोळीवाडा) व नवीन शेवे या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तब्बल 40 वर्षांपासून प्रलंबित असल्याने ग्रामस्थांचा संताप आता उफाळून आला आहे. जेएनपीए प्रकल्पासाठी स्थानिकांनी जमीन, घरे देऊन आणि पारंपरिक उपजीविकेवर परिणाम सहन करूनही पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप पूर्णत्वास न गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे आता “आश्वासन नको, निर्णायक निर्णय हवा!” अशी आक्रमक भूमिका घेत ग्रामस्थांनी आंदोलनाची घोषणा केली आहे.
नवीन शेवा व हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्यावतीने रविवारी (दि.9) नवीन शेवा येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाची निर्णय घेण्यात आले. तसेच, 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनी जेएनपीए प्रशासन भवनासमोर उपोषण करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. या बैठक प्रसंगी माजी आमदार मनोहर भोईर, पंचायत समिती सदस्य दिपक भोईर, सरपंच सोनल घरत, यांच्यासह कमळाकर पाटील, लक्ष्मण म्हात्रे, चंद्रकांत घरत, कृष्णा घरत, बाळकृष्ण पाटील, शैलेश भोईर, पंडित घरत, कमळाकर घरत, गणेश म्हात्रे, सुरेश कोळी, नितीन कोळी, परमानंद कोळी, हरेश कोळी, हेमंत म्हात्रे, एकनाथ घरत यांच्यासह नवीन शेवा व हनुमान कोळीवाडा गावचे प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत पुनर्वसनाच्या प्रक्रियेत गेल्या 40 वर्षांपासून अन्याय व फसवणूक होत असल्याचा आरोप ग्रामस्थ व विस्थापितांमार्फत करण्यात आला आहे. तसेच, 2 बनावट अथवा चुकीचे आज्ञापत्रे तयार करून जेएनपीए व शासनाने दोन्ही गावांची फसवणूक केल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. यावेळी ग्रामस्थांच्या तीन प्रमुख मागण्या उपोषणाच्या केंद्रस्थानी आहेत. बनावट व चुकीची 2 आज्ञापत्रे रद्द करा, तसेच त्या आज्ञापत्राने दिशाभूल करणाऱ्या कारभाराबाबत संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी पहिली मागणी आहे. दुसरी विस्थापितांची फसवणूक केल्याच्या आरोपांची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर 15 दिवसांत कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तर सर्वांत महत्त्वाची मागणी म्हणजे नवीन शेवा आणि शेवा कोळीवाडा गावांचे न्याय्य व पूर्ण पुनर्वसन तातडीने करावे, अशा तीन मागण्या करण्यात आले. त्यासाठी दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8.00 वाजता जेएनपीए प्रशासन भवनासमोर उपोषण करण्यात येणार आहे.





