घंटागाड्या दोन महिन्यांपासून बंद
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन नगर परिषदेच्या घंटागाड्या गेल्या सुमारे दोन महिन्यांपासून नियमितपणे शहरात फिरत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पूर्वी शहरातील घरोघरी जाऊन कचरा संकलित करून तो डंपिंग ग्राऊंडवर टाकला जात होता. मात्र, आता कचरा संकलन व्यवस्था विस्कळीत झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
नगर परिषदेकडून मिळालेल्या माहितीनुसार, कचरा संकलनासाठी देण्यात आलेले जुने कंत्राट संपले असून, नवीन निविदा प्रक्रिया सुरू आहे. नवीन ठेकेदाराची नियुक्ती झाल्यानंतर कचरा संकलन पूर्ववत सुरू होईल, असे सांगितले जात आहे. मात्र, या प्रक्रियेलाही जवळपास दोन महिने उलटून गेल्याने नागरिकांनी रोजचा कचरा नेमका कोठे टाकायचा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ज्यांच्याकडे स्वतःच्या वाड्या आहेत ते नागरिक एखाद्या कोपऱ्यात खड्डा करून कचरा टाकत आहेत. मात्र, भाडेकरू म्हणून राहणाऱ्या नागरिकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. सध्या क्वचित एखादी घंटागाडी ध्वनिक्षेपक लावून एखाद्या रस्त्यावर फिरताना दिसते. मात्र, तीही घरोघरी जाऊन कचरा संकलन करत नसल्याने नागरिकांना तिचा उपयोग होत नाही. गाडी कधी येते आणि कधी निघून जाते हेही नागरिकांना समजत नसल्याची तक्रार आहे. नगर परिषदेकडे एकूण 65 सफाई कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना सध्या केवळ 16 कर्मचारी उपलब्ध असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी मुख्याधिकाऱ्यांकडून देण्यात आली होती. मात्र एवढा मोठा कालावधी उलटूनही नवीन कंत्राट प्रक्रिया पूर्ण का झाली नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
दरम्यान, पावसाळा तोंडावर आला असतानाही शहरातील गटार सफाईची कामे अद्याप सुरू झालेली दिसत नाहीत. त्यामुळे आगामी काळात अस्वच्छता आणि पाणी तुंबण्याच्या समस्येची भीती व्यक्त केली जात आहे. नगर परिषद प्रशासनाने याबाबत तातडीने भूमिका स्पष्ट करून कचरा संकलन आणि गटार सफाईची कामे युद्धपातळीवर सुरू करावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.






