महावितरणकडून ग्राहकांची लूट थांबेना; ग्राहक आंदोलनाच्या पवित्र्यात

| श्रीवर्धन | वार्ताहर |

दर महिन्याची वीज बिले स्वीकारताना महावितरणकडून वीज ग्राहकांची लूट काही केल्या थांबत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महावितरणच्या युनिटप्रमाणे आलेल्या बिलावरती अनेक प्रकारचे चार्जेस लावलेले पाहायला मिळतात.

यामध्ये स्थिर आकार, वहन आकार, इंधन समायोजन आकार, वीज शुल्क, वीज विक्री कर व्याज, इतर आकार, समायोजित रक्कम अशा अनेक प्रकारच्या रकमा लावलेल्या पाहायला मिळतात. एखाद्या ग्राहकाचे वीज बिल रुपये 1200 पर्यंत असेल तर त्याला हे सर्व आकार मिळून जवळ जवळ रुपये 2200 महावितरणला भरावे लागतात. याशिवाय वीज ग्राहकांना बिल भरण्यासाठी अंतिम तारीख दिलेली असते. या अंतिम तारखेनंतर वीज बिल भरल्यास हजार रुपयावरील ग्राहकांना 20 ते 30 रुपये ज्यादा भुर्दंड करण्यात येतो. तर रुपये दोन हजारांवरील बिलावर पन्नास रुपयांपर्यंत भुर्दंड आकारण्यात येतो.

या महिन्यात ग्राहकांना मिळालेल्या वीज बिलावरती अंतिम वीज बिल देयक भरण्याची तारीख 29/10/2022 होती. परंतु, बहुतांश ग्राहकांना बिले 30/10/2022 रोजी प्राप्त झाली आहेत. पर्यायाने ग्राहकांना 20 ते 50 रुपयांपर्यंत जादा पैसे भरावे लागणार आहेत. तसेच ज्या वीज ग्राहकांची बिले पाच हजारांपेक्षा जास्त आहेत, अशांना दीडशे ते दोनशे रुपये जास्त भरावे लागणार आहेत. महावितरणने वीज बिल भरण्याची अंतिम तारीख असण्याच्या कमीत कमी आठ दिवस अगोदर ग्राहकांना बिले मिळतील, अशा प्रकारे योजना करण्याची मागणी वीज ग्राहकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा श्रीवर्धन तालुक्यातील वीज ग्राहकांकडून महावितरणच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Exit mobile version