बिलांचे वाटप उशिरा होत असल्यामुळे नाहक भुर्दंड
| श्रीवर्धन | वार्ताहर |
श्रीवर्धन शहरातील व तालुक्यातील वीज ग्राहकांना वीज बिले उशिरा मिळत असल्यामुळे बिल भरण्याच्या अंतिम तारखेनंतर बिल भरल्यामुळे पन्नास रुपयांपासून ऐंशी रुपयांपर्यंत जादा वीज बिल भरावे लागत आहे. बिल भरण्याच्या अंतिम तारखेच्या एक किंवा दोन दिवस अगोदर ग्राहकांच्या हातात बिले पडत आहेत. महावितरणच्या चुकीमुळे ग्राहकांच्या खिशाला मात्र विनाकारण कात्री लागत आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून श्रीवर्धन महावितरणचे उपकार्यकारी अभियंतापद रिक्त आहे. श्रीवर्धन येथील उपकार्यकारी अभियंता महेंद्र वाकपैंजण यांची रत्नागिरी जिल्ह्यात बदली झाल्यानंतर श्रीवर्धन येथील उपकार्यकारी अभियंता यांचा अतिरिक्त कार्यभार पेणच्या उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे होता. तर, सध्या म्हसळा येथील उपकार्यकारी अभियंता पटवारी यांच्याकडे श्रीवर्धनचा अतिरिक्त कार्यभार आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी उपकार्यकारी अभियंता नेमत नसल्यामुळे वीज ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो सुरळीत करण्यासाठी देखील बराच वेळ लागतो.
तरी गोरेगाव येथील कार्यकारी अभियंता यांनी याबाबीकडे तातडीने लक्ष देऊन श्रीवर्धन महावितरण कार्यालयात कायमस्वरूपी उपकार्यकारी अभियंता पद नेमण्यात यावे. तसेच ग्राहकांना वीज बिले वेळेत देण्यात यावी, जेणेकरून ग्राहकांच्या खिशाला विनाकारण भुर्दंड पडणार नाही, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.