आचार्य महाविद्यालयाकडून परीक्षार्थींची लूट

साडेतीन हजार विद्यार्थ्यांकडून दीड लाखांची वसुली

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील शेलू येथे आचार्य अभियांत्रिकी महाविद्यालय असून, त्या महाविद्यालयात विधी शाखेची सीईटी परीक्षा घेतली जाते.शासनाच्या तंत्र आणि उच्च शिक्षण विभागाच्या वतीने आचार्य महाविद्यालयाला हे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. मात्र, त्या ठिकाणी परीक्षा देण्यासाठी येणार्‍या परीक्षार्थी यांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी 50 रुपये आकारले जात होते. दरम्यान, 15 एप्रिलपासून 28 एप्रिलपर्यंत आचार्य अभियांत्रिकी महाविद्यालयात सीईटी परीक्षा सुरू होत्या आणि त्यामुळे किमान साडेतीन हजार परीक्षार्थी यांच्याकडून साधारण दीड लाख रुपयांची वसुली करणार्‍या आचार्य महाविद्यालयावर कारवाई करावी, अशी मागणी आता पुढे येत आहे.

विधी शाखेत प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. ही सीईटी परीक्षा राज्याच्या विविध केंद्रांवर राज्य सरकारच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून घेतली जाते. त्या सर्व परीक्षांवर नियंत्रण हे शासनाचे असते आणि त्या बदल्यात संबंधित परीक्षा देणारे विद्यार्थी हे परीक्षा फी भरीत असतात. त्यात पिण्याचे पाणी तसेच स्वच्छतागृह आणि परीक्षार्थी यांनी सोबत आणलेल्या गाड्या उभ्या करण्याची व्यवस्था यांचा समावेश असतो. राज्याच्या वेगवेगळ्या भागात विधी शाखेच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यात आली. त्या प्रत्येक परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी यांना सर्व व्यवस्था पुरविण्यात आले आहेत.

मात्र, कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर असलेल्या आचार्य अभियांत्रिकी महाविद्यालय येथे 15 मार्चपासून सीईटी परीक्षा घेतली जात होती. 18 एप्रिल रोजी सुट्टी वगळता 28 एप्रिलपर्यंत म्हणजे 13 दिवस सलग या केंद्रावर परीक्षा सुरू होत्या. या परीक्षा केंद्रावर आठ वर्गामध्ये 35 विद्यार्थ्यांना बसवले जात होते आणि त्यामुळे 13 दिवसात साधारण साडेतीन हजारांहून अधिक परीक्षार्थी यांनी विधी शाखा प्रवेशासाठी सीईटी परीक्षा दिली आहे. परंतु, भावी वकील यांना कर्जत तालुक्यातील मध्य रेल्वेच्या स्थानक असलेल्या शेलू येथील आचार्य अभियांत्रिकी महाविद्यालय येथे असलेल्या परीक्षा केंद्रावर कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नव्हत्या, अशी माहिती परीक्षा देणारे विद्यार्थी देत आहेत.

त्या ठिकाणी परीक्षार्थी यांनी आपल्या सोबत असलेल्या दुचाकी आणि चार चाकी यांचे साठी कोणत्याही स्वरूपातील वाहनतळ उपलब्ध नव्हते.मात्र परीक्षार्थी येणार आणि आपल्याला पार्किंगची नावाखाली पैशांची वसुली करता येणार या इराद्याने ओम पार्किंग सर्विस या नावाने आचार्य महाविद्यालय परिसरामध्ये अनधिकृतपणे वाहनतळ बनवला आहे. त्या पार्किंग सर्विस देणारे यांच्याकडून दुचाकीसाठी 20 रुपये आणि चारचाकी वाहने यांच्यासाठी 50 रुपये पार्किंग फी घेतली जात होती.या केंद्रावर रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील तसेच मुंबईमधील काही परीक्षार्थी परीक्षा देण्यासाठी आले होते.ते सर्व चार चाकी वाहने घेऊन या ठिकाणी आले होते आणि त्यामुळे ओम पार्किंग सर्विस या बेकायदा पार्किंग वसुली करणार्‍याने लाखोंची वसुली केली आहे.त्यामुळे अशा बेकायदा वाहनतळ उभारणार्‍या ओम पार्किंग सर्विस वर महारष्ट्र शासन चौकशी करून कारवाई करणार काय? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दरम्यान, महाविद्यालय परीक्षा प्रमुख पराग जमदरे यांनी देखील आकारण्यात आलेल्या आपल्या पार्किंग फीबद्दल ओम पार्किंग सर्विसची बाजू घेतली आहे.

ओम पार्किंग..
आचार्य महाविद्यालय येथे सीईटी परीक्षा देण्यासाठी येणारे परीक्षार्थी यांच्याकडून पार्किंग फी वसूल करणार्‍या ओम पार्किंग सर्विस चे पावतीवर असलेल्या 9607440765 या नंबर वर आचार्य कॉलेज असे नाव दिसून येत असून, त्या व्यक्तीने परीक्षार्थी यांना तुम्ही इकडे चौकशी साठी या असे सुनावले आहे.त्यामुळे हा बेकायदा वाहनतळ आचार्य महाविद्यालय चालवीत असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.असे हे बेकायदा वाहनतळ उभे करणार्‍या आचार्य महाविद्यालयावर शासनाने चौकशी करावी अशी मागणी परीक्षार्थी यांनी केली आहे.
Exit mobile version