लढवय्या नेता हरपल्याने मोठी हानी- शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांचे प्रतिपादन

सिताराम येच्युरी यांना शेकापकडून श्रद्धांजली

। अलिबाग । प्रतिनिधी ।

सिताराम येच्युरी एका उच्च शिक्षित अधिकार्‍यांचे सुपूत्र होते. ते सुध्दा चांगले अधिकारी बनले असते. परंतु, विद्यार्थी दशेपासूनच गोरगरीब, पिडीत, अन्यायग्रस्तांसाठी काम करण्याचा त्यांचा ध्यास होता. अन्यायाविरोधात उभे राहून शेतकरी, कामगार, कष्टकर्‍यांच्या हितासाठी त्यांनी काम केले आहे. रायगड जिल्ह्यातील सेझ विरोधातील लढ्यामध्ये लाखो शेतकर्‍यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यांचे अलिबागसोबत एक वेगळे नाते होते, त्यांच्यासारखा लढवय्या नेता हरपल्याने डाव्या विचारांच्या चळवळीची फार मोठी हानी झाली आहे, असे प्रतिपादन शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले. शेकापच्यावतीने अलिबागमधील शेकाप भवन येथील सभागृहात कॉ. सिताराम येच्युरी यांची श्रध्दांजली सभा गुरुवारी (दि.19) आयोजित करण्यात आली. यावेळी जयंत पाटील बोलत होते. दरम्यान, कॉ. सिताराम येच्यूरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

याप्रसंगी शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एस. व्ही. जाधव, शेकाप महिला राज्य आघाडी प्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे, अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप राज्य कामगार आघाडीचे प्रमुख प्रदिप नाईक, राजेंद्र कोरडे, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, नागाव सरपंच हर्षदा मयेकर, माजी सरपंच नंदकुमार मयेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते तुकाराम पाटील, विजय गिदी, अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद ठाकूर, जनार्दन पाटील, अलिबाग नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका वृषाली ठोसर, संजना किर, अशोक प्रधान, अवधुत पाटील, अनिल पाटील, पुरोगामी अलिबाग तालुका युवक संघाचे अध्यक्ष तथा मुरूड तालुका संपर्क प्रतिनिधी विक्रांत वार्डे, सुरेश खोत, आदी शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सिताराम येच्युरी यांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या लढ्यात, आंदोलनात अनेकवेळा मार्गदर्शन केले आहे. कोकण भवन येथे एक लाख शेतकर्‍यांच्या उपस्थितीत सेझविरोधात मोर्चा काढला होता. या मोर्चात सिताराम येच्युरी यांनी सर्वांना संबोधित केले होते. या लढ्याची दखल त्या वेळच्या सरकारला घ्यावी लागली होती. देशाच्या निर्णय प्रक्रियेत सहभाग असलेला येच्युरी यांच्या रुपाने देशाला चांगला नेता मिळाला होता. वैचारिक बांधिलकी जपणारे ते एक नेते होते. त्यांच्या सहवासात राहण्याची संधी मला अनेकवेळा बैठका, लढ्याच्या माध्यमातून मिळाली, असे पाटील यांनी सांगितले. गोरगरीबांचे कायदे अबाधित राहावेत, लोकशाही टिकावी यासाठी ते कायमच प्रयत्नशील राहिले. पंचायतीपासून संसदेपर्यंत अस्थिरता निर्माण होण्याचा धोका त्यांच्या लक्षात आला होता. हे थांबविण्यासाठी इंडिया आघाडीच्या माध्यमातून अनेक पक्षाला एकत्र आणण्याचे काम सिताराम येच्युरी यांनी केले. खर्‍या अर्थाने इंडिया आघाडीची स्थापना त्यांनी केली, असे ते म्हणाले. डाव्या आघाडीचे स्फुर्तीस्थान अलिबाग होते. ते पुढे नेण्याचे काम नारायण नागू पाटील, प्रभाकर पाटील यांनी केले. त्यांचे काम आपण सर्वांनी अधिक जोमाने करण्याची गरज आहे. देशात सध्या वेगळ्या पध्दतीने राजकारण सुरु आहे. येच्युरी यांच्या निधनामुळे देशातील कष्टकरी, कामगार, डाव्या चळवळीचे फार मोठे नुकसान झाले आहे. एक चांगला मित्र, गोरगरीबांसाठी लढणारा नेता गेल्याने मोठी हानी झाली असून त्यांची आठवण कायमच स्मरणात राहिल, असे पााटील यांनी स्पष्ट केले.

येच्युरी डाव्या आघाडीचे प्रमुख मार्गदर्शक होते. शेकापची जडणघडण डाव्या विचारावर अधारीत आहे. तेलगू ब्राह्मण वर्गात जन्माला आलेली व्यक्ती अधिकारी बनले असते. परंतु त्यांच्यामध्ये देशसेवेची भावना रुजली. कष्टकरी, कामगार, महिला, पिडीतांसाठी उभे राहिले पाहिजे. त्यामुळे येच्युरी यांनी त्यांच्या हितासाठी चळवळ उभी केली, असे शेकापच्या राज्य महिला आघाडी प्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे यांनी सांगितले. विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी कष्टकरी, गोरगरीबांसाठी काम करण्यास सुरुवात केली होती. डाव्या पक्षाला ताकद देण्याचे काम त्यांनी केले आहे. रायगड जिल्ह्यातील 2007 मधील सेझ विरोधातील मोर्चाचे नेतृत्व येच्युरी यांनी केले होते. त्यामुळे सेझ विरोधातील लढ्यात त्यांचेही मोठे योगदान राहिले आहे, हे विसरता येणार नाही. एक लढवय्या व डाव्या चळवळीचा योध्दा हरपला असे अ‍ॅड.म्हात्रे यांनी सांगितले.

सिताराम येच्युरी एक अभ्यासू व्यक्तीमत्व होते. एकनिष्ठा पाळणारे ते नेते होते. सध्या देशातील राजकारण पातळी सोडून चालू असताना, आपल्या पक्षाची विचारधारा शेवटच्या श्‍वासापर्यंत जनतेपर्यंत पोहचवून ठेवण्याचे आदर्शवत काम त्यांनी प्रामाणिकपणे केले आहे. ते कामगार चळवळशी निगडीत होते. आपल्या लेखनातून त्यांनी डावे विचार व्यक्त केले आहे, असे शेकाप राज्य कामगार आघाडीचे प्रमुख प्रदिप नाईक यांनी सांगितले.

सिताराम येच्युरी यांची राजकीय वाटचाल विद्यार्थी दशेपासून झाली. त्यावेळच्या बोर्डाच्या परिक्षेत ते प्रथम आले. जगातले कोणतेही विषय सोप्या पध्दतीने सुलभ करून सांगण्याची त्यांची हातोटी होती. सध्याच्या राजकारणामुळे इंडिया आघाडी ही काळाची गरज आहे, हे ओळखून त्यांनी सर्व पक्षांना एकत्र करून एक मुठ बांधण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. येच्युरी यांच्या निधनामुळे कामगार चळवळीचे फार मोठे नुकसान झाले आहे, असे शेकापचे राजेंद्र कोरडे यांनी सांगितले.

कुशाग्र बुध्दीमतेचा अभ्यासू नेता होता. न्यायाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे हा विचार त्यांनी विद्यार्थी दशेपासूनच घेतला होता. विद्यार्थी, कष्टकरी, कामगार आदींच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यात त्यांचा हातखंडा होता. आदिवासींना मालकी हक्काच्या जमीनी देण्यासाठी येच्युरी यांचा महत्वाचा वाटा राहिला आहे, असे प्रा. एस. व्ही. जाधव यांनी सांगितले.

Exit mobile version