शेतकऱ्यांकडून भरपाई देण्याची मागणी
| माणगाव | प्रतिनिधी |
कोकणातील बागायतदार शेतकरी यंदाच्या हंगामात मोठ्या संकटात सापडले आहेत. बदलत्या हवामानाचा फटका बसल्यामुळे आंबा, काजू, नारळ, फणस आणि कोकम या कोकणातील प्रमुख नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वर्षभर कष्ट घेऊन उभ्या केलेल्या बागांवर निसर्गाच्या अवकृपेने पाणी फिरल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी किमान 5 लाख रुपयांची नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी जोरदार मागणी कोकणातील शेतकरी, बागायतदार आणि विविध संघटनांकडून करण्यात येत आहे.
यंदा हिवाळ्यानंतर अचानक बदललेले हवामान, अवकाळी पाऊस, वाढलेली आर्द्रता, धुके आणि तापमानातील अस्थिरता यामुळे आंबा आणि काजू बागांवरील मोहोर मोठ्या प्रमाणात गळून पडला. अनेक ठिकाणी बागांमध्ये भरघोस मोहोर दिसत असतानाच काही दिवसांतच तो झाडाखाली पडल्याने शेतकऱ्यांच्या आशा धुळीस मिळाल्या. फळधारणा कमी झाल्याने उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आंबा-काजू बागायती हे शेतकऱ्यांचे मुख्य उत्पन्नाचे साधन आहे. अनेक शेतकरी वर्षभर मेहनत करून बागांची निगा राखतात, औषध फवारणी, खत, मजुरी आणि देखभालीसाठी मोठा खर्च करतात. मात्र, यावर्षी निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे त्यांच्या मेहनतीचे फळ मिळण्याऐवजी मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. फक्त आंबा आणि काजूच नव्हे तर नारळ, फणस आणि कोकम या पारंपरिक पिकांवरही याचा परिणाम झाला आहे. काही भागांत फळधारणा अत्यंत कमी झाली असून अनेक बागांमध्ये रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादन घटले आहे. त्यामुळे अनेक बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी कर्ज काढून बागांची देखभाल केली होती; परंतु उत्पादन न मिळाल्याने ते आता आर्थिक अडचणीत सापडले आहेत.







