| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ शहरातील जुन्या बाजारपेठेतील इलेक्ट्रिक वस्तूंची विक्री करणार्या दुकानाला शनिवारी (दि. 05) पहाटेच्या वेळी आग लागली. या आगीमध्ये दुर्गा सेल्स या दुकानातील तब्बल चार लाखांच्या इलेक्ट्रॉनिक साहित्याचे नुकसान झाले असून, साधारण चार लाख रुपयांच्या किमती इलेक्ट्रिक वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे नमूद करण्यात आले आहे.
नेरळ येथील जुनी बाजारपेठ येथे असलेले दुर्गा सेल्स या इलेक्ट्रिक वस्तूंचे दुकान आहे. या दुकानाला शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास भीषण आग लागली होती. दरम्यान, स्थानिक व्यापारी निलेश परदेशी हे कामानिमित्ताने रस्त्याने जात असताना त्यांना दुकानांमध्ये आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यांनी दुकान मालक रवी कटारिया यांना संपर्क करून दुकानाला आग लागल्याची माहिती दिली. दुकानात लागलेली आग ही स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने आटोक्यात आणण्यात आली. त्यामुळे होणारी मोठी दुर्घटना टळली आहे. या आगीत चार लाखांच्या वस्तूंचे नुकसान झाल्याची नोंद नेरळ पोलीस ठाण्यात आली आहे.
दुकानाला लागलेली आग ही इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे लागलेली दिसून येत आहे. यामध्ये टीव्ही, फ्रिज, पंखे, एसी अशा इलेक्ट्रिक वस्तूंचा समावेश आहे. ही आग विझवत असताना शेजारील असलेले व्यापारी संजय जैन यांचा आग विझवण्याच्या धावपळीमध्ये डावा पाय फ्रॅक्चर झाला असून, खोपोली येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.