95 गुन्ह्यांची उकल करण्यास रायगड पोलिसांना यश
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
रायगड जिल्ह्यामध्ये मागील तीन वर्षांमध्ये 103 जणांचा वेगवेगळ्या कारणावरून खून झाल्याची माहिती समोर आली आहे. रायगड पोलीस दलाच्या अखत्यारित येणार्या 13 तालुक्यांपैकी 12 तालुक्यांत खुनाचे गुन्हे घडले आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त अलिबाग, पेण, कर्जत, खालापूर व रोहा या तालुक्यांमध्ये खूनाचे गुन्हे दाखल झाले आहेत. दाखल गुन्ह्यांपैकी 95 गुन्ह्यांची उकल करण्यास रायगड पोलिसांना यश आले आहे.
रायगड जिल्ह्यात औद्योगिकीकरणामुळे नागरिकीकरण झपाट्याने वाढत आहे. लहान-मोठे प्रकल्प जिल्ह्यात आहेत. रोहा, अलिबाग, कर्जत, खालापूर या भागात प्रकल्पांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या तालुक्यात रोजगारासाठी येणार्यांची संख्यादेखील प्रचंड वाढली आहे. रायगड जिल्ह्याच्या हद्दीत 28 पोलीस ठाणे आहेत. या पोलीस ठाण्यामार्फत जिल्ह्यातील गावे, वाड्यांमधील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा प्रयत्न केला जातो. गुन्हे घडू नये, यासाठी पोलिसांमार्फत वेगवेगळ्या पद्धतीने जनजागृती केली जाते. कायदा व सुव्यवस्था बिघडविणार्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईदेखील पोलिसांकडून केली जाते. पोलिसांची ही कारवाई कौतुकास्पद आहे. मात्र, जिल्ह्यात संशयावरून व अन्य कारणावरून खून करणार्यांचा आकडादेखील वाढत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. अलिबाग तालुक्यातील नागाव येथील साताड बंदरानजीक एका महिलेचा मृतदेह तीन वर्षांपूर्वी सापडला होता. त्या महिलेची गळा दाबून हत्या केल्याची माहिती समोर आली होती. तसेच, अलिबाग तालुक्यात प्रेमात आडकाठी ठरणार्या पोटच्या मुलांना एका महिलेने ठार केल्याची घटना घडली होती.
जिल्ह्यामध्ये मागील तीन वर्षांत 103 जणांचा वेगवेगळ्या कारणावरून खून झाला आहे. रायगड पोलिसांनी वेगवेगळ्या यंत्रणेमार्फत खुन्यांचा शोध घेऊन त्यांना अटकदेखील केली आहे. 103 पैकी 95 गुन्ह्यांची उकल करण्यास रायगड पोलिसांना यश आले आहे. मात्र, आजही आठ गुन्ह्यांतील आरोपींचा शोध पोलिसांकडून लागला नसल्याचे आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये अलिबाग, खालापूरमध्ये प्रत्येकी दोन आणि पेण, सुधागड (पाली), रोहा, महाडमध्ये प्रत्येकी एक या गुन्ह्यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील खून प्रकरणातील आरोपींना अटक करून त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. प्रलंबित गुन्ह्यांबाबत कायमची फाईल बंद केली जात नाही. संबंधित आरोपींचा शोध सुरुच असतो. त्यांची माहिती घेण्याचे काम वेगवेगळ्या माध्यमातून सुरु असते.
– सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, रायगड
खुनांवर दृष्टीक्षेप-
तालुकानिहाय | गुन्हे | उघड | प्रलंबित |
अलिबाग | 16 | 14 | 02 |
पेण | 13 | 12 | 01 |
कर्जत | 13 | 13 | 00 |
खालापूर | 15 | 13 | 02 |
माणगाव | 07 | 07 | 00 |
श्रीवर्धन | 05 | 05 | 00 |
म्हसळा | 02 | 02 | 00 |
सुधागड (पाली) | 04 | 03 | 01 |
तळा | 03 | 03 | 00 |
मुरूड | 05 | 05 | 00 |
महाड | 08 | 07 | 01 |
रोहा | 12 | 11 | 01 |
एकूण | 103 | 95 | 08 |