पदपथावर थाटली वाहतूक विभागाची चौकी
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
नवीन पनवेल येथील एचडीएफसी चौकात वाहतुकीचे नियम मोडणार्या वाहनचालकांविरोधात वाहतूक विभागाकडून नियमित कारवाई करण्यात येत असते. मात्र, त्याचवेळी पादचार्यांना चालण्यासाठी असलेल्या पदपथावर वाहतूक विभागाकडून चौकी थाटण्यात आली असून, कायद्याच्या रक्षकांकडूनच या ठिकाणी कायद्याचे उल्लंघन केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
दुचाकी चालवताना हेल्मेट न वापरणे, चारचाकी चालवताना सीट बेल्ट न लावणे, मोबाईलवर बोलणे, सिंग्नल तोडणे तसेच ओव्हर स्पीड वाहन चालवणे अशा व इतर प्रकारे नियमांचे उल्लंघन करणार्या वाहन चालकांवर वाहतूक विभागाचे कर्मचारी कायमच कारवाई करत असतात. नियम मोडणार्या वाहन चालकांवर जरब बसावी म्हणून मोठा आर्थिक दंडदेखील वाहतूक विभागाचे कर्मचारी वाहनचालकांना थोटावत असतात. नियम मोडणार्या वाहनचालकांना दंड थोटावून यापुढे कायद्याचे पालन करूनच वाहन चालवण्याच्या सूचनादेखील यावेळी वाहतूक विभागाचे कर्मचारी वाहनचालकांना देत असतात. आशा वेळी कायद्याचे रक्षण करणार्या वाहतूक विभागाकडून पादचार्यांना चालण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या पदपथावरच चौकी थाटून पादचार्यांचा हक्क हिरावला जात असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिक करत आहेत.
हाकेच्या अंतरावर असलेली चौकी बंद
पनवेल-माथेरान मार्गावर वाहतूक विभागाकडून ज्या ठिकाणी पदपथावर चौकी थाटण्यात आली आहे, त्या ठिकाणावरून हाकेच्या अंतरावर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील खांदेश्वर पोलीस ठाण्याची कायमस्वरूपी चौकी आहे. मात्र, याठिकाणी कोणतेही पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याचे पाहायला मिळाले असून, केवळ दुपारच्या वेळेत आराम करण्यासाठी कर्मचारी या चौकीचा वापर पोलीस कर्मचारी करत असल्याची माहिती परिसरात राहणार्या नागरिकांनी दिली आहे.