गहाळ मोबाईल दिले मालकांच्या ताब्यात
| माणगाव | सलीम शेख |
सर्वसामान्य नागरिकांचे गहाळ अथवा चोरीस गेलेले मोबाईल फोन शोधून देण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या पोर्टलचा प्रभावी वापर करत माणगाव पोलीस ठाण्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अंमलदार सुग्रीव उद्धवराव मुंडे यांनी मागील एक महिन्याच्या कालावधीत पोर्टलच्या माध्यमातून गहाळ झालेल्या तब्बल 15 मोबाईल फोनचा शोध लावला. या मोबाईल फोनची एकूण अंदाजित किंमत सुमारे 4 लाख रुपये इतकी आहे.
गहाळ मोबाईल बाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची सखोल पडताळणी करून तसेच पोर्टलवर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संबंधित मोबाईलचा मागोवा घेण्यात आला. अथक प्रयत्नांनंतर विविध ठिकाणांहून हे मोबाईल हस्तगत करण्यात आले. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित तक्रारदारांना त्यांचे मोबाईल सुस्थितीत परत करण्यात आले. आपले हरवलेले मोबाईल पुन्हा मिळाल्याने तक्रारदारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांनी माणगाव पोलीस ठाण्याचे तसेच पोलीस निरीक्षक संजय बांगर आणि पोलीस अंमलदार सुग्रीव मुंडे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. यावेळी नागरिकांनी देखील माणगाव पोलिसांच्या या कार्याचे कौतुक केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकांना दिलासा देण्याचे काम माणगाव पोलीस ठाण्याकडून सातत्याने सुरू असून, भविष्यातही अशाच प्रकारे जनसेवेसाठी कटिबद्ध राहणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. हरवलेला मोबाईल शोधून देणे ही केवळ मालमत्ता परत मिळवून देण्याची बाब नसून नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ करण्याचे काम आहे, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.







