आई, पत्नी आणि दोन मुले गंभीर जखमी; टेम्पोचालक फरार
। खोपोली । प्रतिनिधी ।
खोपोली-पाली रस्त्यावरून महाडचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शहाजी धडे खोपोलीच्या दिशेने जात होते. शेमडी गावाजवळ आले असता समोरून भरधाव येणाऱ्या टेम्पो चालकाने कारला जोरदार धडक दिली. हा भीषण अपघात शुक्रवारी (दि. 04) 8 वाजण्याच्या सुमारास घडला आहे. या अपघातात प्रवीण धडे यांच्यासह पत्नी, आई आणि दोन मुले गंभीर जखमी झाले असून त्यांना एमजीएम हास्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर टेम्पोचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
महामार्ग पोलीस केंद्र महाडचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शहाजी धडे (35 रा. उल्हासनगर) हे आपली स्विफ्ट कार घेऊन आपल्या कुटूंबासमवेत पालीवरून खोपोली असा प्रवास करत होते. दरम्यान, शेमडी गावाजवळ आले असता समोरून येणाऱ्या आयसर टेम्पोचालक विजय सुभाष पाटील याने टेम्पो भरधाव वेगात चालवून ओव्हरटेक करीत असताना कारला जोरदार धडक दिली. या अपघातात प्रवीण धडे यांच्यासह पत्नी, आई आणि दोन मुले गंभीर जखमी झाले. या सर्वांना तात्काळ पुढील उपचारासाठी खाजगी ऍम्ब्युलन्सने एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, या अपघातानंतर चालक हा पळून गेला आहे.
याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.