आग लागून लाखो रुपयांचे नुकसान

अग्निशमन जवान-शुभम करडे यांच्या कामगिरीचे कौतुक 

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड एकदरा ग्रामपंचायत हद्दीतील खोरा बंदरजवळ हिरा निवास बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर पहाटेच्या दरम्यान आग लागुन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. खोरा बंदर जवळील परिसरात राहणारे मनोज सतविडकर व बड्या सतविडकर हे रोजच्या प्रमाणे सकाळी उठल्यावर बाजुला असणाऱ्या हिरा निवास बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरुन धुर व आग दिसल्याने ओरडा ओरड केल्यानंतर बिल्डिंगच्या बाजुला असणाऱ्या घरातील अजय शिंदे व त्यांचे मंडळी बाहेर पडली. आग विझविण्यासाठी प्रयत्न केला परंतु आगीचा भडका जास्त वाढत गेल्याने स्वतःहा पहिले आपल्या मोटारसायकलवरून मुरुड-जंजिरा नगरपरिषद कार्यालय जाऊन अग्निशमन दलाच्या जवानांना आगी संदर्भात माहिती दिली.


शणाचाही विलंब न करता अग्निशमन दलाच्या जवान राकेश पाटील, शुभम करडे, अभिजित कारभारी, नितेश माळी, अविनाश अवघडे, सचिन कोरके या जवानांनी अग्निशमन दलाची गाडी घेऊन घटनास्थळी पोचुन आग विझवण्यात सुरूवात केली. परंतु आग मोठ्या प्रमाणावर भडकत असल्याने जावानांना मोठी कसरत करावी लागली. यामधील शुभंम करडे व मितेश माळी यांनी बिल्डींगमध्ये प्रवेश करुन पहिले दोन भरलेले सिलेंडर बाहेर काढून सर्वाची धाकधुक कमी केली. या जवानांनामुळे ही बिल्डिंग वाचली नाहीतर या सिलेंडरमुळे बिल्डिंग व बाजुच्या घरांना देखील धोका होता. या कामगिरी मुळे या जवानांचे कौतुक होत आहे. या आगीत संपुर्ण घर आगीत भस्मसात होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Exit mobile version