| रसायनी । वार्ताहर ।
वादळी वार्यासह आलेल्या पावसात वीज पडल्याने शनिवारी दुपारी वीज महावितरणच्या वासांबे-मोहोपाडा कार्यलयाअंतर्गत साहित्याचे मोठे नुकसान झाले. वासांबे-मोहोपाडा येथील एमआयडीसी कामगार वसाहतीत आणि सेबी फाट्याजवळ उच्च दाबाच्या वीज वाहिन्या असलेल्या खांबावरील इन्सुलेटर फुटले. परिणामी साधारण सात तास वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे विजेअभावी नागरिकांचे हाल झाले.
वीज महावितरणच्या कर्मचार्यांनी तातडीने इन्सुलेटर बदली केले. त्यानंतर रात्री सव्वा नऊच्या वासांबे-मोहोपाडा आणि बाजूच्या गावाचा वीज पुरवठा सुरळीत झाला. पावसामुळे काही ठिकाणी कापणीस तयार भात पिकाचे नुकसान झाले. पावसाने विश्रांती घेतल्याने तापमानात मोठी वाढ झाली होती. दरम्यान शनिवारी दुपारी विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. साधारण तासभर कोसळलेल्या पावसामुळे उकड्याने हैरण नागरिकांना दिलासा मिळाला.
वादळी पावसामुळे महावितरणच्या साहित्याचे नुकसान झाले आहे. कर्मचार्यांनी बारा इन्सुलेटर, हुक, पिन बदली करून रात्रीच वासांबे-मोहोपाडा परिसराचा वीज पुरवठा पूर्ववत केला.
– किशोर पाटील, सहायक अभियंता, महावितरण