जिल्ह्यात एक हजार हेक्टर भात क्षेत्राचे नुकसान

पुराच्या पाण्याबरोबर माती, दगड शेतात
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामध्ये लागवड केलेली भातशेती वाहून गेल्याने जिल्ह्यातील एक हजार हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. पंचनामे सुरू झाले असून, नुकसानीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

संततधार पावसामुळे खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर तालुक्यातील नद्यांना पूर आला होता. पुराचे पाणी लगतच्या गावांमध्ये शिरले होते. 24 तासांपेक्षा अधिक काळ पाणी राहिल्याने मालमत्तेचे कोट्यवधींचे नुकसान झाले. शिवाय भातशेतीलाही फटका बसला. जुलैच्या पहिल्या आठवड्यात भात लावणीची कामे पूर्ण झालेली होती. त्याचवेळी पूर आल्याने भातशेती वाहून गेली आहे. काही ठिकाणी लागवड करू दोन-तीन दिवस झाले होते. पुराच्या पाण्याबरोबर माती, दगड शेतात आले आहेत. अद्याप काही ठिकाणी भात खाचरातून पाणी साचले आहे. पूर ओसरल्यानंतर कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र फूटभर पाणी असल्यामुळे नुकसानीचा अंदाज घेणे अशक्य झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, एक हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, चार दिवसांत पंचनामे पूर्ण होतील, असे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.

रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदीच्या किनार्‍यावर असलेल्या हरचिरी, चांदेराई, तोणदे, पोमेंडी, टेंबे, सोमेश्‍वर, चिंचखरी या गावांतील भातशेतीचे नुकसान झाले आहे. चिंचखरी येथील बांधलेला बंधारा फुटल्यामुळे शेतकरी हेमंत फाटक यांच्या शेतात खारे पाणी आले होते. बंधार्‍याचा पंधरा फूट रुंदीचा भाग कोसळल्याने नुकसान झाले आहे. गेले तेरा दिवस भात शेती पाण्याखाली राहिल्यामुळे नुकसान झाले आहे. काजळी नदीकिनारी असलेल्या पोंमेंडीतील शेतकर्‍यांच्या शेतात पूर्ण गाळ साचून राहिला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, चिपळूण तालुक्यात 536 हेक्टर, संगमेश्‍वरात 303 हेक्टर, राजापूर 100 हेक्टर, रत्नागिरी 60 हेक्टर, खेड तालुक्यात 32 हेक्टरचे नुकसान नोंदविण्यात आले आहे. लवकरच अहवाल प्राप्त होणार असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Exit mobile version