। नवीन पनवेल । वार्ताहर ।
माती चोरीचे पनवेल तालुक्यात प्रमाण वाढू लागले आहे. वीटभट्टीसाठी, इमारतीच्या भरावासाठी तसेच अन्य कारणांसाठी मोठ्या प्रमाणात माती चोरी केली जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शासनाना लाखो रुपयांच्या महसूलवर पाणी फेरावे लागत आहे. पनवेल तालुक्यात वीट भट्टीचा व्यवसाय सुरू असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात माती चोरी केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. रॉयल्टी बुडवून आणि शासनाची फसवणूक करून मातीची वाहतूक केली जात आहे. बेकायदेशीरपणे उत्खनन चालू असताना देखील तलाठी, मंडळ अधिकारी यावर कारवाई का करत नाही असा सवाल स्थानिक विचारत आहेत.
वन विभाग, शासकीय जागेतून शासनाची रॉयल्टी बुडवून मातीची चोरी डंपर, ट्रक, हायवामधून केली जात आहे. पोलीस, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या डोळ्यादेखत मातीचे डंपर जात असताना देखील त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. याउलट माती चोरांना प्रशासनाकडून अभय दिले जात असल्याचे बोलले जात आहे. दिवसाढवळ्या पनवेल परिसरातून मातीचे ट्रक, डंपर भरून शेकडो ब्रास माती वाहून नेली जात आहे. मात्र शासनाचा महसूल बुडत असताना देखील कारवाई केली जात नाही. ठिकठिकाणी मातीची चोरी होत असून मातीसाठी खड्डे खणले जात आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा र्हास होत चालला आहे. पनवेल तालुक्यात रस्ते, ईमारतीची कामे वीटभट्टीच्या कामाना वेग आला आहे. 100 ब्रास मातीची रॉयल्टी भरून 500 ब्रास पेक्षा अधिक माती नेऊन शासनाची फसवणूक केली जात आहे. याकडे तलाठी, मंडळ अधिकारी डोळेझाक करताना दिसून येत आहेत. अनेक ठिकाणी भरावासाठी लागणारी माती नेली जात आहे. माती काढून ती बांधकाम व्यावसायिकांना भरावासाठी विकली जात आहे. चढ्या दराने मातीची विक्री करून काळा पैसा कमविला जात आहे. या सर्व उत्खननामुळे नैसर्गिक संपत्तीचा नाश होत आहे.