। पाली-सुधागड । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यात माती उत्खनन व भरावांना सध्या वेग आल्याचे दिसून येत आहे. मात्र, ही माती उत्खननं व भरावं रात्रीच्या अंधारात व सुट्टीच्या वारीच का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर, याकडे महसूल अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष तर करत नाहीत ना? असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.
पावसाळा संपला की नोव्हेंबर डिसेंबरपासून विकासाला गती मिळते. सध्या सुधागड तालुक्यात जागेची गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हिरवा निसर्ग, नद्या, धरणे तसेच, जैव विविधतेने समृद्ध असलेला सुधागड तालुका अनेकांचे लक्ष वेधत आहे. विकासकांकडून बंगले बांधून विकण्याचा व्यवसाय जोरदार सुरू आहे. त्यामुळे माती उत्खनन व मातीची भरावं जोरदार चालू आहेत. मात्र, ही उत्खननं व भरावं रात्रीच्या अंधारात व सुट्टीच्या वारीच होत असल्याने त्याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
सध्या सुधागड तालुक्यात परळी, जांभूळपाडा, महागाव, नांदगाव या भागात मातीची उत्खननं व भरावं जोरदार चालतात. शासनाचा महसूल बुडवण्यासाठी माती माफिया हे रात्रीच्या अंधारात व सुट्टीच्या वारी माती उत्खनन व भरावं करत असतात. हजारो ब्रास माती उत्खनन करुन जुजबी रक्कम रॉयल्टीच्या नावाखाली भरली जाते आणि महसूल अधिकारी रॉयल्टी भरल्याचे सांगतात. त्यामुळे महसूल अधिकारी, तलाठी यांचे आणि माती माफियांचे आपसात काही कनेक्शन नाही ना? असा देखील प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच, अनेक तलाठ्यांना तर चालू असलेल्या उत्खननाबाबत कल्पना देखील नाही. त्यामुळे माती माफिया हे महसूल अधिकारी तसेच तलाठी यांना जुमानत नाहीत किंवा की तुमचं आमचं जमतंय म्हणून हा राजरोसपणा चालू आहे, असा सवालही नागरीक उपस्थित करत आहेत.