गोदामात रसायनांचा बेकायदा साठा
| उरण | वार्ताहर |
सरकारी यंत्रणांच्या आशीर्वादाने उरण तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये मनमानी पद्धतीने उभारलेली गोदामे, त्यात बेकायदा केलेला रसायनांचा साठा कायमच वादग्रस्त ठरत असतो. गोडाऊन झोन झपाट्याने विस्तारत असताना, त्याच्या सुरक्षेची कोणतीही यंत्रणा सक्रीय नाही. या ठिकाणी साधे अग्निशमन केंद्रही कार्यान्वित केलेले नाही. त्यामुळे लाखो नागरिक, हजारो कामगार आणि शेकडो उद्योजक व उरणकर ज्वालामुखीच्या तोंडावर आहेत, अशी चर्चा सध्या उरणमध्ये जोर धरत आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
राज्य सरकारने या भागाला गोडाऊन झोनचा दर्जा दिला. मात्र, त्याच्या सुनियोजित विकासासाठी काडीचाही प्रयत्न केलेला नाही. सरकारमध्ये बसलेल्या तथाकथित नियोजनकर्त्यांना त्याचे कोणतेही भान नव्हते. अवजड वाहनांची सतत ये-जा असल्याने येथील रस्त्यांची चाळण झाली आहे. कंपाऊंड पद्धतीने जिथे जागा असेल, त्यानुसार गोदामे बांधली गेली. अंतर्गत रस्तेही खड्ड्यांत गेले आहेत. त्यामुळे तासन्तास येथे वाहतूक खोळंबते. धूळ आणि वाहनांमुळे हवेतील प्रदूषण प्रचंड वाढले असून, अनेकांना श्वसनाचे आजार जडले आहेत. गोदामांत मोठ्या प्रमाणात थर्माकोल आणि प्लास्टिकचा कचरा जमा होतो. त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याची कोणतीही यंत्रणा नसल्यामुळे गोदामाभोवतालच्या मोकळ्या जागांमध्ये हे धोकादायक पदार्थ चक्क जाळून प्रदूषण वाढीस हातभार लावला जातोय. एवढा मोठा झोन विस्तारत असताना अनेक वेळा आगी लागण्याच्या घटना घडल्या व आग लागून दुर्घटना घडलेल्या आहेत. मात्र, आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अग्निशमन दलही नसल्याने अर्धा-पाऊण तासांनी गाड्या दाखल होतात. तोपर्यंत कोट्यवधींचे नुकसान झालेले असते. गोदामात सुरु असलेल्या चोर्यांचा सिलसिला रोखण्यात पोलीस यंत्रणेला काही यश येत नाही, त्यामुळे उरणकरांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.