| आगरदांडा | प्रतिनिधी |
शालेय विद्यार्थ्यांना भूगोल या विषयात अधिक रस वाढावा व याविषयाची आवड निर्माण होण्यासाठी तसेच, स्पर्धा परीक्षेसाठी पूर्वतयारी म्हणून सदरील भूगोल प्रज्ञा शोध परीक्षा महाराष्ट्रातील भूगोल विषय मंडळाकडून घेतली जाते. नांदगाव हायस्कूलमधून 288 शालेय विद्यार्थी या परीक्षेस बसले होते. त्यापैकी या शाळेतील इयत्ता 9 मधील विद्यार्थिनी निधी नितीन पवार हिला शंभरपैकी 84 गुण प्राप्त झाले. तिला सुवर्णपदक बहाल करण्यात आले. इयत्ता 9 वी मधील श्रावणी मिलिंद कुमरोटकर हिला शंभरपैकी 80 गुण प्राप्त झाले. तिला रौप्यपदक बहाल करण्यात आले. इयत्ता सातवीमधील निखिल संदेश पाटील याला शंभरपैकी 74 गुण प्राप्त झाले. त्यास कांस्यपदक बहाल करण्यात आले. या परीक्षेत 40 शालेय विद्यार्थ्यांना 60 पेक्षा जास्त गुण प्राप्त झाले आहेत. भूगोल विषय समन्व्यक म्हणून सागर राऊत, योगेश पाटील व महेश वाडकर यांनी उत्कृष्ट कामकाज पाहिले. तसेच, या परीक्षसेसाठी मुलांना उत्तेजित केल्याबद्दल मुख्याध्यापिका अर्चना खोत व पर्यवेक्षक प्रतीक पेडणेकर यांनासुद्धा भूगोल महामंडळाकडून सन्मानचिन्ह देण्यात आले.
सर्व यशस्वी शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय यशवंत नगर नांदगाव येथील पटांगणावर मुख्याध्यापिका अर्चना खोत यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. यावेळी पर्यवेक्षक प्रतीक पेडणेकर, रवींद्र ढोले, भरत चव्हाण, शिल्पा कळके, दत्तात्रेय खुळपे, शिक्षकेतर प्रतिनिधी संतोष बुल्लू, भारती बांद्रे, रिंकल तिडके आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर राऊत यांनी केले, तर आभार योगेश पाटील यांनी केले.