| आगरदांडा | प्रतिनिधी |
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अधिनस्त कृषी विज्ञान केंद्र, रोहा आणि मुरूड-जंजिरा शेतकरी उत्पादक कंपनी, मुरूड-जंजिरा यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र शासनाच्या नैसर्गिक शेती प्रकल्पांतर्गत एकदिवसीय शेतकरी प्रशिक्षण शीघ्रे येथे नुकतेच आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. मनोज तलाठी हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे मार्गदर्शक तज्ज्ञ म्हणून डॉ. राजेश मांजरेकर, जीवन आरेकर व डॉ. प्रमोद मांडवकर हे उपस्थित होते. प्रशिक्षणास प्रमुख अतिथी म्हणून कृषी विज्ञान केंद्र, रोहाच्या शास्त्रीय सल्लागार समितीचे सदस्य श्रीधर जंजिरकर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला कृषी विज्ञान केंद्राचे विस्तार विषय तज्ज्ञ डॉ. प्रमोद मांडवकर यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाची रूपरेषा नमूद केली. नैसर्गिक शेतीमध्ये पर्यावरण, आरोग्य व आर्थिकदृष्ट्या अनुकूलता कशाप्रकारे आहे याबद्दल त्यांनी विवेचन केले. डॉ. मनोज तलाठी यांनी नैसर्गिक शेतीतज्ज्ञ म्हणून मार्गदर्शन करताना गोपालन आधारित शेती पद्धतीची माहिती दिली. शेतीचा दृष्टीकोन विपुल प्रमाणात धान्य उत्पादन करून देताना जलप्रदूषण, जैवविविधतेचे नुकसान आणि जमिनीची धूप यांना प्रतिबंध करतो हे समजावून सांगितले. तसेच बीजामृत, जीवामृताची निर्मिती व वापर याविषयी शेतकर्यांना डॉ. मनोज तलाठी यांनी मार्गदर्शन केले. जीवन आरेकर यांनी पिकांवरील किड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना करताना दशपर्णी अर्क, ब्रम्हास्त्र व निमास्त्र निर्मिती व वापर याविषयी माहिती दिली. प्राण्यांचे मलमूत्र आणि वनस्पती यांचा उपयोग किडप्रतिबंधक आणि पिकाच्या वाढीस पोषक कसा आहे, हे त्यांनी शेतकर्यांना समजावून दिले.
शेतकर्यांना मुरूड-जंजिरा शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये सहभागी होता यावे, याकरिता कंपनीचे अध्यक्ष श्रीधर जंजिरकर आणि कंपनीच्या सी.ई.ओ. ऋतुजा मॅडम यांनी शेतकर्यांना माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये काय हे समजावून सांगताना सदस्यांना मिळणारे लाभ, सदस्य नोंदणीची प्रक्रिया, शुल्क त्याचप्रमाणे कंपनीचे सध्या चालू असलेले प्रकल्प आणि भविष्यातील नियोजित प्रकल्पाविषयी माहिती दिली व सहभागाविषयी आवाहन केले.
दुपारच्या सत्रानंतर प्रगतशील शेतकरी दत्ता गोविंद मांदाडकर यांचे सेंद्रिय शेतीच्या प्रक्षेत्रात भेट देण्यात आली. मांदाडकर यांच्या दुग्धव्यवसाय, शेळीपालन व भाजीपाला लागवड प्रक्षेत्रावरील विविध पिकांची माहिती शेतकर्यांना देण्यात आली व सेंद्रिय/नैसर्गिक निविष्ठा निर्मिती व वापर यांचे प्रत्यक्ष विवेचन डॉ. राजेश मांजरेकर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य मुशरीफ खतीब व शीघ्रे ग्रामस्थ यांनी प्रयत्न केले. या प्रशिक्षणाचा लाभ 55 शेतकर्यांनी घेतला.