जिल्ह्यात तुळशी विवाहांची लगबग

| महाड | वार्ताहर |

रायगड जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागात तुळशी विवाहाची परंपरा आजही भक्तिभावाने जोपासली जात आहे. शुक्रवारपासून (दि.24) तुळशी विवाहाला सुरुवात होत असून घरोघरी शुभमंगल सावधान आणि मंगलाष्टकांचे सुरात तुळशी विवाहाचा सोहळा साजरा होणार आहे.

दिवाळी संपली की कार्तिकी एकादशीनंतर सर्वांना वेध लागतात ते तुळशीच्या लग्नाचे. कोकणात तुळशी विवाह हा घरातील लग्नसोहळाच असतो. पौराणिक कथेनुसार, कार्तिक महिन्यात भगवान विष्णूचे शाळिग्राम स्वरूप आणि माता तुळशीचा विवाह करण्याची प्रथा आहे. एकादशी व द्वादशीला प्रामुख्याने हा विधी करतात, परंतु काही ठिकाणी कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह लावण्याची प्रथा आहे. ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरी, अंगणात तुळशी वृंदावन असते. शहरात बाल्कनी, गच्चीत तुळशी वृंदावन दिसून येतात. यंदा पंचांगानुसार द्वादशी तिथी गुरुवार, 23 नोव्हेंबर रोजी रात्री 9.01 वाजता सुरू होईल. शुक्रवार, 24 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7:06 वाजता संपेल. हिंदू परंपरेनुसार उदय तिथीला सण साजरा करण्यात येतो. म्हणून उदय तिथीनुसार, 24 नोव्हेंबरपासून तुळशी विवाहला सुरुवात होईल.

असा होतो विवाह
घरातील कन्या या भावनेतून तुळशी विवाहाची तयारी केली जाते. तुळशी विवाहामुळे कर्त्याला कन्यादानाचे पुण्य लाभते, असे मानले जाते. ज्या कोणाकडे तुळस असते ते तुळशी विवाह सोहळा करतात. या शुभ मुहूर्तावर तुळशीमातेचा विवाह केल्यास, वैवाहिक जीवन सुखी राहते, असे मानले जाते. दारात चुन्याची रांगोळी काढली जाते. सध्या तुळशीच्या रोपाला नवीन माती घालून वृंदावनाची रंगरंगोटी करण्याची लगबग सुरू आहे. प्रत्यक्ष विवाहप्रसंगी दारात आंब्याच्या पानांचे तोरण बांधतात, झेंडूच्या फुलांनी सजावट केली जाते. मंजिरी असलेली तुळस लग्नासाठी योग्य असते, असे मानले जाते. सजवलेल्या उसांचा व केळ्यांच्या पानांचा मंडप केला जातो. तुळशी विवाहासाठी पाटावर आसन टाकून तुळस आणि शाळिग्राम मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात. बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणत विवाह लावला जातो. विष्णू आणि तुळशीची आरती करून पूजेनंतर प्रसादाचे वाटप केले जाते. दिवाळी फराळ, लाह्या, खजूर, बत्ताशे, ऊसाचे तुकडे वाटतात. या पूजेमध्ये मुळा, रताळे, आवळा, मनुका, पेरू विविध फळे यांचा समावेश असतो.
Exit mobile version