| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
हरिणाया विधानसभेमध्ये पुन्हा एकदा भाजपने बाजी मारली असून, जवळपास 49 जागा जिंकल्या आहेत. भाजपने बहुमताचा 46 हा आकडा गाठला. तर, काँग्रेसला 36 जागांवर समाधान मानावे लागले. हरियाणातल्या विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅट्ट्रिक करत भाजप तिसर्यांदा सत्ता स्थापन करणार आहे.
निकालात सकाळच्या सत्रात काँग्रेस आघाडीवर होती, पण नंतर भाजपनं मोठी झेप घेतली. लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानं हरियाणाच्या भाजपचा हा पहिला मोठा विजय आहे. हरियाणाच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी विजयादशमीच्या दिवशी 12 ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या सात महिने आधी भाजपने अचानक तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना पदावरून हटवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. खरे तर, भाजपने 2019 मध्येही खट्टर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होती. तेव्हा भाजपला बहुमत मिळाले नव्हते. मात्र, जेजेपीच्या पाठिंब्याने भाजपला सरकार स्थापन करण्यात यश आले.
विनेशने मैदान मारलं..!
हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार कुस्तीपटू विनेश ऑलिम्पिक खेळाडू विनेश फोगाट हिने मैदान मारले असून, जुलाना मतदारसंघातून सहा हजारांहून अधिक मतांनी भाजपच्या योगेश बैरागी यांचा पराभव केला. विनेश यांना 65,080 मते, तर योगेश कुमार यांना 59,065 मते मिळाली. कुस्तीपटूंचे आंदोलन आणि ऑलिम्पिक अपात्रतेमुळे चर्चेत आलेल्या विनेश फोगट यांना काँग्रेसने निवडणूक मैदानात उतरवले होते. विनेशच्या विजयामुळे काँग्रेसने 19 वर्षांनंतर येथे मुसंडी मारली आहे. काँग्रेसचा उमेदवार शेवटचा 2005 ला येथून विजयी झाला होता. त्यानंतर आता पुन्हा या मतदारसंघात काँग्रेसने बाजी मारली आहे.






