कर्जत तालुक्यात लंम्पीचा सहावा बळी

मृत पशुपालकांना आर्थिक मदत जाहीर
। नेरळ । वार्ताहर ।

लंम्पी या आजाराने कर्जत तालुक्यात तब्बल सहा जनावरे दगावली आहेत. तालुक्यात आतापर्यंत पिंपळोली गावात चार, तर खांडस व कळंब गावात प्रत्येकी एक-एक जनावर मृत झाले आहे. तालुक्यात खांडस, पिंपळोली, कळंब, वावे, बेडीसगाव, आंबिवली, कोल्हारे, तळवडे, बोरगाव, साळोखतर्फे वरेडी, जिते आणि आंत्ररट या गावातील 46 गोवंशीय जनावरांना लंम्पी आजराची लागण झाली होती. त्यातील 29 जनावरे पूर्ण बरी झाली आहेत.

कर्जतमधील सर्व गावांतील जनावरांचे लसीकरण 100 टक्के पूर्ण झाले तरी, लसीकरणाच्या दिवशी काही कारणाने जनावरे ही रोग प्रतिबंधक लसीकरणपासून वंचित राहिली असल्यास, पशुपालकांनी तात्काळ आपल्या नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यास संपर्क साधावा, असे आवाहन संबंधित अधिकार्‍यांनी केले आहे. दरम्यान, पशुधन विभागाने त्या मृत जनावरांच्या पशुपालकांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्यानुसार पशुपालकांना सहा जनावरांचे 87 हजार रुपये यांची मदत जाहीर झाली आहे. त्या मदतीचे वाटप तालुका स्तरावर करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पशुधन अधिकारी डॉ. शाम कदम यांनी दिली आहे. मात्र ही मदत तुटपुंजी असल्याची ओरड सर्व शेतकरी यांच्याकडून केली जात आहे.

Exit mobile version