कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी महिलांची आरोग्य विभागाला साथ
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आता पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया होऊ लागल्या आहेत. तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मागील चार महिन्यात तब्बल पावणे तीनशे शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. दरम्यान, तालुक्यातील महिला वर्गदेखील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी सकारात्मक असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन गुरव यांनी दिली आहे.
कर्जत तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेकच्या आरोग्य विभागाकडून सहा ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून सर्वसामान्य गरीब रुग्णांना सेवा दिली जाते. त्यात नेरळ हे मध्य रेल्वेवरील स्थानकाच्या जवळ असल्याने या प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात रुग्णांची ये-जा असते. त्याचवेळी आदिवासी भागातील कळंब, खांडस आणि आंबिवली या प्राथमिक आरोग्य केंद्रातदेखील रुग्णानाची वर्दळ असते. दुसरीकडे शहराच्या जवळ असल्याने कडाव आणि मोहाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्गात रुग्णांची गर्दी असते. मात्र या सहापैकी चार प्राथमिक आरोग्य केंद्रात गेली अनेक वर्षे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया होत नव्हत्या. देशाचे धोरण असलेल्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया तालुक्यातील नेरळ, कळंब, आंबिवली आणि खांडस या चार प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करणारे ऑपरेशन थिएटर हे मे 2024 बंद होते. तर कडाव आणि मोहाली या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रात अल्प प्रमाणात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया व्हायच्या.
प्राथमिक आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया होत नसल्याने शेवटी कर्जत उपजिल्हा रुग्णालय आणि कशेळे ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रिया होत होत्या. मात्र ग्रामीण भागातील महिला पूर्ण क्षमतेने कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यासाठी येत नसल्याचे आढळून आले होते. त्यामुळे वर्षभरापूर्वी कर्जत तालुका पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी या पदावर नियुक्त झालेले डॉ. नितीन गुरव यांनी कर्जत तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कायापालट करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. डॉ. गुरव यांनी कर्जत तालुका आरोग्य अधिकारी पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर पूर्णवेळ तालुक्यातील आरोग्य व्यवस्था सुधारण्याचे काम हाती घेतल्याचे दिसून येत आहेत. कर्जत तालुक्यातील सर्वाधिक बाह्यरुग्ण यांची गर्दी असणार्या नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच आदिवासी भागातील कळंब या ठिकाणी असलेली शस्त्रक्रिया विभाग यांची दुरुस्ती तसेच निर्जंतूक करून घेतले.
चार महिन्यात झालेल्या शस्त्रक्रिया
नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र .. 67
कळंब प्राथमिक आरोग्य केंद्र .. 72
मोहाली प्राथमिक आरोग्य केंद्र .. 45
कडाव प्राथमिक आरोग्य केंद्र .. 95
एकूण शस्त्रक्रिया .. 279
कर्जत तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया वैद्यकीय अधिकारी करू शकतील अशा सर्व शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यातून दहा वर्षाहून अधिक काळ बंद असलेल्या शस्त्रक्रिया नेरळ आणि कळंब येथे सुरु करण्यात यश आले आहे. आपल्याकडे अजूनही खांडस आणि आंबिवली प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया होत नाहीत, त्या ठिकाणीदेखील अशी सुविधा सुरु करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
– डॉ. नितीन गुरव,
तालुका आरोग्य अधिकारी कर्जत पंचायत समिती