विनयभंग, बलात्काराच्या गुन्ह्यात वाढ; महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
रायगड जिल्ह्यामध्ये 2024 या वर्षभरात विनयभंग व शारीरिक अत्याचाराचेे 264 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी 259 गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आले आहे. 2023 च्या तुलनेने दोन्ही गुन्ह्यांमध्ये यावर्षी पाच आणि सातने वाढ झाली आहे. जिल्ह्यात महिला अत्याचाराचा आलेख वाढत असल्याचे चित्र पोलिसांच्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात महिला सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे.
महिला सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने पावले उचलली. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पथनाट्य व अन्य उपक्रमांतून जनजागृती करण्यात आली. महिलांवर अत्याचार करणार्यांना दणका देण्याचे काम पोलिसांकडून कायमच करण्यात आले. अनेकांविरोधात कठोर कारवाईदेखील पोलिसांनी केली आहे. महिला सुरक्षेसाठी जिल्ह्यात भरोसा सेल, पोलीस काका, पोलीस दीदी, जागरुक नागरिक अशा अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून महिला सुरक्षेसाठी पावले उचलली आहेत.
कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच समाज गुन्हेमुक्त करण्यासाठी जनतेचीदेखील मदत घेतली. शाळा, महाविद्यालयात जाऊन मुलीच्या सुरक्षेचे धडे देण्यात आले. अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालयात जनजागृतीपर वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले. महिला अत्याचार करणार्यांना पोलिसी दणका देण्याबरोबरच ग्रामीण व शहरी भागात हे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांकडून जनजागृती करण्यात आली. तरीदेखील जिल्ह्यामध्ये महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असल्याचे आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यामध्ये 2024 मध्ये शारीरिक अत्याचाराचे 107 गुन्हे दाखल झाले होते. या सर्वच गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आले. त्यामध्ये 74 गुन्हे पोक्सो अंतर्गत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. शारीरिक अत्याचाराचे गुन्हे शंभर टक्के उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले असले, तरी 2023च्या तुलनेने 2024 मध्ये या गुन्ह्यात सातने वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे. 2023 मध्ये शंभर गुन्हे दाखल होते. 2024 मध्ये 107 गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती पोलिसांच्या वार्षिक आकडेवारीनुसार दिसून आले आहे.
जिल्ह्यात विनयभंगाचे 157 गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी 152 गुन्ह्यांची उकल करण्यास यश आले असून, पाच गुन्ह्यांची अद्याप उकल झाली नाही. 2023 मध्ये 152 गुन्हे दाखल झाले होते. 2024 मध्ये 257 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे 2023च्या तुलनेने 2024 मध्ये विनयभंगाच्या गुन्हेगारीत पाचने वाढ झाल्याची माहिती आकडेवारीनुसार स्पष्ट झाली आहे. जिल्ह्यात महिला अत्याचाराबरोबरच अल्पवयीन मुलींवरदेखील अत्याचार्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. वर्षाला पाच ते सात गुन्हे काही पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडतच असतात, त्यामुळे महिला व अल्पवयीन मुली सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. याकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
2024 मध्ये महिला अत्याचाराचे 107 गुन्हे दाखल झाले असून, सर्वच गुन्ह्यांची उकल झाली आहे. 2023 च्या तुलनेने 2024 मध्ये या गुन्ह्यांत सातने वाढ झाली आहे. तसेच विनयंभाचे 157 गुन्हे दाखल झाले असून 152 गुन्हे उघड करण्यास पोलिसांना यश आले आहे. 2023 च्या तुलनेने 2024 मध्ये या गुन्ह्यात पाचने वाढ झाली आहे.
महिला व अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून कडक पाऊल उचलण्यात आले आहे. संबंधितांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची सूचना पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकार्यांना दिल्या आहेत. गावागावात जनजागृती करून महिला सुरक्षेसाठी पावले उचलली आहेत.
सोमनाथ घार्गे,
पोलीस अधीक्षक, रायगड