फलकांवरील नियमावलीला केराची टोपली
। रेवदंडा । वार्ताहर ।
पुरातत्व विभागाचे केंद्रीय सर्वेक्षण विभागाच्यावतीने रेवदंडा आगरकोट किल्ला परिसरात नियमावलीचे जुने व जीर्णावस्थेतील कालबाह्य फलक काढून टाकून नूतन फलक ठिकठिकाणी लावले आहेत. मात्र रेवदंडा आगरकोट किल्ला परिसरात पुरातत्व खात्याची केंद्रीय सर्वेक्षण विभागाची नियमावली फक्त फलकांवर असून आगरकोट किल्ला परिसरात नियमबाह्य बांधकामे बिनधोकपणे करण्यात येत असून पुरातत्व खात्याच्या दुर्लक्षतेबद्दल इतिहासप्रेमी मंडळी व ग्रामस्थ यांची पूर्णतः नाराजी व्यक्त करत आहेत.
रेवदंडा आगरकोट किल्ला परिसरात नियमबाह्य बांधकामे झाली आहेत व सुरू आहेत. याबाबत अनेकदा स्थानिक ग्रामस्थांनी पुरातत्व खात्याकडे निवेदन दिले आहेत. मात्र ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदन पत्रास वारंवार केराची टोपली दाखविली जाते. पुरातत्व खाते ग्रामस्थांच्या निवेदनाने फक्त नोटीस काढण्याचे काम करते, नियमबाहय कामे मात्र थांबविली जात नाही. अथवा कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. ही नियमबाह्य बांधकामे बिनधोकपणे सुरू असल्याने पुरातत्व खात्याबद्दल नाराजी ग्रामस्थ व इतिहासप्रेमी मंडळी व्यक्त करत आहेत.
पुरातत्व खात्याच्या सर्वेक्षण विभागाने जीर्णावस्थेतील जुने फलक हटवून नव्याने नियमावलीचे फलक नव्याने ठिकठिकाणी लावले आहेत. मात्र या फलकांवरील नियमावली येथे भेटी देणारे इतिहासप्रेमी मंडळी व ग्रामस्थ यांना वाचण्यासाठी आहेत असेच म्हटले जाते. या फलकांवरील नियमावलीस फाट्यावर मारून किल्ला परिसरात नियमबाह्य बांधकामे पूर्ण केली गेली आहेत व अद्यापी बांधकामे सुरू आहेत. पुरातत्व विभागाच्या या फलकांचा उपयोग काय? ते कशाकरीता लावता? असा संप्तत सवाल ग्रामस्थ व इतिहासप्रेमी मंडळी करत आहेत.