माणगाव येथील बैठकीत संघटनेच्या नव्या कार्यकारिणीची निवड
। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव तालुका रास्तभाव धान्य दुकानदार कल्याणकारी संघटनेची बैठक माणगाव तहसील कार्यालयाच्या सभागृहात 6 जानेवारी सोमवारी रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्याध्यक्ष शेखर देशमुख व अनिल मोरे यांच्या उपस्थितीत पार पडली.
यावेळी माणगाव तालुका संघटनेचे मावळते अध्यक्ष अनिल मोरे यांची कारकीर्द संपल्याने व नवीन कार्यकारिणी निवडण्यासाठी हि बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सुशिक्षित व तरुण चेहरा व संघटनात्मक बांधणीचे कौशल्य असणारा चेहरा म्हणून राकेश पवार यांची एकमताने तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी नव्याने तालुका कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली असून राकेश पवार व त्यांच्या सर्व नवनियुक्त पदाधिकारी व सदस्यांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावेळी माणगाव तालुका रास्तभाव धान्य दुकानदार कल्याणकारी संघटना तालुकाध्यक्ष राकेश पवार, उपाध्यक्ष वर्षा लाड, सचिव नागेश सुर्वे, सदस्य समीर पवार, शितल शिंदे तसेच विविध पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
यावेळी समारोपपर भाषणात राकेश पवार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून संघटनेने माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी सर्वच्या सहकार्याने पार पाडेन असा विश्वास देत. तालुक्यातील रेशन दुकानदार व केरोसीन धारक दुकानदार यांना वेळोवेळी येणार्या अडचणी सोडवण्यासाठी व त्यांना भेडसावणारे प्रश्न शासन दरबारी निपक्षपणे मांडून ते सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहील, असा शब्द देत संघटनेतील सर्वांना बरोबर घेऊन काम करू असा विश्वास दिला.