। खरोशी । वार्ताहर ।
पेण एज्युकेशन सोसायटीच्या पेण येथील भाऊसाहेब नेने महाविद्यालयात भूगोल दिनानिमित्त तसेच वाचन संकल्प महाराष्ट्राचा पंधरवडा यानिमित्त विविध प्रकारचे नकाशे, नकाशा पुस्तक (अॅटलास) तसेच भौगोलिक छायाचित्रे, उपग्रह प्रतिमा, प्रकल्प अहवाल यांचे प्रदर्शन दि. 14 आणि 15 जानेवारी 2025 रोजी संपन्न झाले.
महाविद्यालयातील कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी तसेच प्राध्यापकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. फक्त मार्क किंवा अभ्यास या पलीकडे, मानवी जीवनातील प्रत्येक टप्प्यावर नकाशांचे महत्त्व कसे आहे हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. नैसर्गिक आपत्ती, देशाचे संरक्षण, नैसर्गिक संसाधनांचे नियोजन, व्यवस्थापन, समस्यांचे निराकरण करण्यासाठी नकाशांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, हे भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ अरूण पाटील यांनी विद्यार्थ्यांना विस्ताराने व उदाहरणांसह पटवून दिले. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. धारप सर, ग्रंथपाल गोपाल जोशी आणि ग्रंथालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.