| पेण | प्रतिनिधी |
खारेपाट विभागाच्या पाचवीला पाणीप्रश्न पुजलेला आहे. गेली आठवडाभर या विभागात दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने वाशी, ओढांगीसह खारेपाटातील जनता हैराण झाली आहे.
खारेपाट विभागासाठी शहापाडा धरणातून पाणीपुरवठा होत असून, रायगड जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग तो करण्यात येत आहे. मात्र, अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून खारेपाटाला मिळालेला शाप म्हणजे दूषित पाणी, दुर्गंधीयुक्त पाणी, अपुरे पाणी या सर्व बाबींमुळे दरवर्षी पाणीप्रश्न ऐरणीवर येत असून, अगदी 1960 पासून आजपर्यंत निवडणुकीचा मुद्दा हा खारेपाटाचा पाणीप्रश्न असतोच. मात्र, जवळपास 65 वर्षे उलटून गेले तरी, आजही खारेपाटातील पाणीप्रश्न पूर्णतः सुटलेला नाही. लोकप्रतिनिधींनी आश्वासनांपलीकडे खारेपाटाचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी 100 टक्के प्रयत्न केले नाहीत. आजच्या स्थितीला खारेपाट विभागात दोन दिवसआड पाणीपुरवठा केला जात असून, तो ही कमी दाबाने होत आहे. गेली आठवडाभर जो काही पाणीपुरवठा होत आहे, तो दुर्गंधीयुक्त आहे. त्यामुळे पाणी पिणे तर दूरच, अन्न शिजवण्यासाठीदेखील या पाण्याचा उपयोग करता येईना. या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे वाशी व ओढांगी विभागात पोटाच्या आजारात वाढ झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. या विभागाच्या जनतेने अखेर या विभागात अशा प्रकारचा पाणीपुरवठा करूच नका, असा पवित्रा घेतला आहे. मात्र, याचा काहीच परिणाम अधिकारीवर्गावर पडलेला दिसला नाही.
दुर्गंधीयुक्त पाण्याने अनेकांचे आरोग्य बिघडलेले आहे. आजच्या घडीला सर्वसामान्य नागरिकांना विकतचे पाणी घेणे परवडत नाही. तरीदेखील आपले आरोग्य बिघडू नये म्हणून नागरिक पदरमोड करून जारचे पाणी विकत घेत आहेत. आम्हाला तर दाट संशय येत आहे की, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि हे पाणी विक्रेते यांच्यामध्ये काही तरी संगनमत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे प्रदूषित पाणी आम्हाला पुरविले जात आहे. या षड्यंत्राविरूध्द आम्ही रस्त्यावर उतरून लढाई देण्याच्या तयारीत आहोत.
जितेश पाटील,
ओढांगी ग्रामस्थ
पाईप लाईन लिकेज झाल्याने बाहेरील पाणी पाईपमध्ये शिरत असून, त्यामुळे पाण्याला दुर्गंधी येण्याची शक्यता आहे. याबाबत आम्हाला समजताच तो लिकेज शोधून काढला असून, त्या लिकेजेचे दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. लवकरात लवकर लिकेज काढून पाणीपुरवठा पूर्ववत होईल.
आर.एम.राठोड,
अभियंता, पाणीपुरवठा विभाग, जि.प.
दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा झाल्याबद्दल पहिल्यांदा मी नागरिकांची दिलगिरी व्यक्त करतो. परंतु, ज्या काही समस्या झाल्या, त्या एमजीपीच्या लिकेज पाईप लाईनमुळे झाल्या आहेत. त्या आम्ही सुधारल्या असून, यापुढे असा प्रकार होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेत आहोत, तसेच पूर्ण लाईनवर देखरेख करण्यासाठी एका कर्मचार्याची नेमणूक केली आहे.
रवी पाचपोर,
उपअभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा