काँग्रेसचे अलिबाग शहर अध्यक्ष समीर ठाकूर यांची मागणी
| रायगड | खास प्रतिनिधी |
अलिबाग एसटी स्टँड आणि आयडीबीआय बँकेसमोरील रस्ता दुभाजक खूपच लांबीचे असल्याने अलिबाग बसस्थानकातून बाहेर पडणार्या तसेच अलिबाग बसस्थानकामध्ये येणार्या बसेसना वळसा घेताना त्रास होता. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणार्या दुभाजकांची लांबी कमी करण्याची मागणी काँग्रेसचे अलिबाग शहर अध्यक्ष समीर ठाकूर यांनी केली आहे. अलिबाग नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना याबाबतचे निवदेन दिले आहे.
अलिबाग हे पर्यटनदृष्ट्या विकसित होत असलेले शहर आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटकांची रेलचेल असते. त्यामुळे वाहनांची संख्या वाढली आहे. शहराच्या प्रमुख भागांमध्ये सातत्याने आपणास वर्दळ पहायला मिळते. वाहतूक कोंडीची समस्या आता नित्याचीच झाली आहे. त्यातच अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा हा कायमचाच पडलेला आहे. त्यातच अलिबाग एसटी स्टँड आणि आयडीबीआय बँकेसमोरील दुभाजकांची लांबी अधिक आहे. या दुभाजकांच्या लांबीमुळे अलिबाग एसटी स्टँडजवळ नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. या मार्गावर अनेकदा छोटे-मोठे अपघात झालेले आहेत. अलिबाग शहरामध्ये प्रवेश करण्यासाठी हा प्रमुख मार्ग असल्याने नागरिकांनाही या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या रस्ते दुभाजकांची लांबी कमी केल्यास या भागातील वाहतूक कोंडी फुटून वाहतूक सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे.