। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
मकर संक्रात आणि जागतिक भूगोल दिनाचे औचित्य साधत पाली सुधागड येथील शेठ ज.नौ. पालीवाला महाविद्यालयात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची रंगत महाविद्यालयाच्या वाणिज्य, विज्ञान व कला विभागातील मुलांनी वाढवली.
या कार्यक्रमात मॉडेल, पोस्टर, रांगोळी, प्रश्नमंजुषा अशा अनेक प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राध्यापक सागर ससाने यांच्या संकल्पनेतून ज्वालामुखी, सौरमंडळ यांचे मॉडेल, भूगोलातील स्थळदर्शक, हवामान दर्शक, प्राकृतिक व राजकीय नकाशे, भौगोलिक उपकरणे, पृथ्वीगोल यांचे प्रदर्शन व चित्र प्रदर्शन भरवण्यात आले होते. वाढते प्रदूषण व बदलते हवामान ऋतुमान पाहता आपण या दिनाला महत्त्व द्यायला हवे, असे मत महाविद्यालयातील प्राध्यापक सागर ससाने यांनी मांडले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधाकर लाहुपचांग यांनी केले व भूगोल विभाग प्रमुख डॉ. सर्जेराव आ. पाटील यांनी मुलांना भूगोलाचे महत्त्व व भूगोल विषय आजच्या काळाची गरज हे आपल्या मनोगताद्वारे समजावून सांगितले. यावेळी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अनिल झेंडे व ग्रंथपाल लिंतेज उके यांनी उपस्थित राहून मुलांना जगाच्या भूगोलाची तोंड ओळख करून दिली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक महेश राहीज यांनी केले.