निधी मंजूर, तरी काम अडले कुठे?
| तळा | वार्ताहर |
तळा शहरातील तळा बसस्थानकाच्या कामाला अद्यापही मुहूर्त मिळत नसल्याने निधी मंजूर असताना बसस्थानकाचे काम अडले तरी कुठे, असा प्रश्न आता तळावासियांकडून उपस्थित केला जात आहे. तळा बसस्थानकाचे संपूर्ण काम करण्यासाठी परिवहन विभागाकडून निधी उपलब्ध व्हावा यासाठी मंत्री आदिती तटकरे यांनी प्रस्ताव दिला होता व त्यासाठी पाठपुरावादेखील केला होता. या पाठपुराव्याच्या अनुषंगाने जवळपास 1 कोटी 71 लाख रुपयांचा निधी हा या कामासाठी मंजूर करण्यात आला होता. तसेच 76 लाखांचा पहिला टप्पा वर्ग झाल्याचीही माहिती प्राप्त झाली होती.
या बसस्थानकाच्या कामाचे भूमीपूजन मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते 14 ऑक्टोबर 2024 रोजी ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले होते. मात्र, या भूमीपूजनाला जवळपास तीन महिन्यांचा कालावधी लोटत आला तरी अद्यापही कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही. तळा बसस्थानकाचे सध्याचे चित्र पाहता, बसस्थानकासमोरील खडकाळ जागेमुळे चालकाला बस लावण्यास मोठी अडचण होते, स्थानकाची संरक्षक भिंत अद्यापही तुटलेल्या अवस्थेत आहे. तसेच शौचालय, मुतारीची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे तळा बसस्थानकाच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी, अशी मागणी तालुकावासियांकडून केली जात आहे.