। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतातील एका खासगी कंपनीने प्रथमच ग्रेनेड तयार केले असून, त्याची पहिली बॅच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय लष्कराला सुपूर्द करण्यात आली आहे. हे मल्टी-मोड हँड ग्रेनेड नागपूरमधील इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह लिमिटेडने डीआरडीओच्या मदतीने तयार केले आहेत. भारतीय लष्करासाठी भारतात दारुगोळा तयार होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे. सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडच्या मालकीची असलेल्या कंपनीने मागील महिन्यापासून सशस्त्र दलांना शस्त्रे पुरवण्यास सुरुवात केली आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे एक लाख ग्रेनेडच्या पहिल्या खेपीची गुणवत्ता तपासणी यशस्वी झाली असून, ती लष्कराचा सोपवण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात एमएमएचजीचे ग्रेनेड ईईएलचे अध्यक्ष एस.एन. नुवाल यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना सुपूर्द केले. या कार्यक्रमात भारतीय लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे, लेफ्टनंट जनरल एके सामंत्र, डीजी इन्फंट्री आणि डॉ. जी सतीश रेड्डी, डीआरडीओचे अध्यक्ष आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.