जयंद्रथ खताते यांचा खळबळजनक आरोप
सहकार पॅनेलच्या कारभाराविरोधात पुकारले बंड
। चिपळूण । वार्ताहर ।
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवडणूक 19 नोव्हेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आली असून या निवडणुकीत तानाजी चोरगे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय सहकार पॅनल निवडणूक लढवत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सदस्य संख्या जास्त आहे. मात्र उमेदवार निवडताना राष्ट्रवादीचे चिपळूणचे आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेशभाई कदम, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष शौकत मुकादम यांना विश्वासात न घेता हे पॅनल केल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे चिपळूण तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी करून घरचा आहेर दिला. यासंदर्भातील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते
याप्रसंगी ते म्हणाले की, सदरचे पॅनलमध्ये जुनेजाणत्या, शेतकी विषयातील तज्ञ उमेदवारांना डावलून जे पहिले संचालक आहेत त्यांनाच उमेदवारी देण्याचा घाट घालण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा न करता उमेदवार बदलले आहेत. शेतकी तसेच बँक विषयी परिपूर्ण ज्ञान असणार्या महिलांना डावलले गेले आहे. जिल्हयात अनेक महिला पक्षासाठी कार्यरत असताना एकाच महिलेला पदे दिली जात असल्याने तालुक्यातुन अनेक महिला तसेच कार्यकर्त्यांनी आपल्या कडे नाराजी बोलून दाखवली.
या विषयाला वाचा फोडण्यासाठीच आपण पत्रकार परिषद घेतली असून चिपळूण तालुक्या प्रमाणेच संपूर्ण जिल्ह्यात आपण पॅनल उभे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.आणि तालुकाध्यक्ष म्हणून ह्या घटनेचा आपण निषेध करत असल्याचे देखील खताते यांनी यावेळी सांगितले. आगामी दिवसांमध्ये जनता आणि कार्यकर्ते यांच्या आग्रहास्तव पॅनल पूर्ण ताकतीनिशी उभे करणार असल्याचा पुनरोच्चारही त्यांनी यावेळी केला. चोरगे हे शरद पवारांच्या नावाखाली पॅनल काढून आपल्या मर्जीतील लोकांची वर्णी लावून कारभार करत आहेत. त्याला वाचा फोडण्यासाठी तसेच बँकेच्या विरोधातील वातावरण असल्याने त्याला पाठबळ देण्यासाठी पूर्ण ताकतीनिशी आपण उभे ठाकणार असल्याचे देखील यावेळी सांगितले.
यावेळी उपस्थित महिला पदाधिकार्यांनी देखील दिशा दाभोळकर यांच्या निवडीबद्दल नाराजी व्यक्त करून आपण इतके वर्षे पक्षाचे काम करून सुद्धा नेहमीच डावलण्याचे कारस्थान जिल्ह्यातील काही मंडळी करत आहेत. शरद पवार हे नेहमीच महिलांना समान संधी देण्याबाबत सहमत असताना इथे मात्र ठराविक जणांनाच सर्व ठिकाणी संधी दिली जात आहे. मग आम्ही काय फक्त आंदोलनच करत बसायचे का ? असा सवाल चित्रा चव्हाण यांनी उपस्थित केला. यावेळी मात्र आम्ही गप्प बसणार नसल्याचे महिला कार्यकर्त्यांनी सांगितले.
- खताते उभे करत असलेल्या पॅनेलबद्दल आमदार शेखर यांनी आपल्या शुभेच्छा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांचे जे काही म्हणणे असेल, तर त्यांनी ते जिल्हाध्यक्षांकडे मांडावे असा सल्ला देखील दिला आहे. – आमदार शेखर निकम