माफिया डॉन सुरेश पुजारी अटकेत

मुंबई | प्रतिनिधी |
कधीकाळी अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीसाठी काम करणार्‍या सुरेश पुजारीला बेड्या ठोकण्यात अखेर मुंबई पोलिसांना यश आलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस सुरेश पुजारीच्या मागावर होते.
2007मध्ये सुरेश पुजारीनं भारताबाहेर पलायन केलं होतं. तेव्हापासून त्याला अटक करण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न केले जात होते. अखेर, पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं असून सुरेश पुजारीला फिलिपिन्समधून अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुरेश पुजारीला 15 ऑक्टोबरला अटक करण्यात आली असल्याची माहिती नवभारत टाईम्सनं दिली आहे. आता फिलिपिन्समधून त्याचं भारताकडे प्रत्यार्पण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सुरेश पुजारीच्या अटकेमुळे अडरवर्ल्डमधील जवळपास सर्वच मोठे डॉन अटकेत आले आहेत. छोटा राजन, रवी पुजारी, एजाज लकडावाला यांना देखील भारताच्या हवाली करण्यात आलं आहे. दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर आणि त्याच्या भाच्याच्या अटकेमुळे डी गँगच्या कारवाया देखील काहीशा कमी झाल्याचं दिसत आहे. दाऊद गँगकडून खंडणीसाठी येणारे कॉलही गेल्या काही काळापासून बंद असल्याची माहिती मिळत आहे.

Exit mobile version