‘हर हर महादेव’ चा आवाज घुमला; जिल्ह्यात ठिकठिकाणी महाशिवरात्री उत्साहात

भाविकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा
। अलिबाग । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यात रविवारी महाशिवरात्री उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. प्रत्येक तालुक्यात शिवमंदिरात, तीर्थस्थळांवर शिवभक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली. दरम्यान, अनेक ठिकाणी मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. अलिबाग तालुक्यातील चौल रामेश्‍वर, मापगाव येथील कनकेश्‍वर, नारंगी भुवनेश्‍वर आदी ठिकाणी भक्तांनी महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. ‘हर हर महादेव’चा निनाद आणि सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवभक्त व आयोजकांनी देवाधिदेव महादेवाला नमन केले.

कनकेश्‍वर येथे भक्तांची मांदियाळी
रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले व अलिबाग तालुक्यातील श्रीक्षेत्र कनकेश्‍वर येथे महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांनी प्रमाणात गर्दी करत शिवलिंगाचे दर्शन घेतले. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरावर व मंदिर परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती, तसेच संध्याकाळी पालखी सोहळा व दीपप्रज्ज्वलन मोठ्या उत्साहात करण्यात आला. तसेच रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी लक्षणीय होती.

भुवनेश्‍वर येथे भाविकांची गर्दी
अलिबाग तालुक्यातील भुवनेश्‍वर येथे महाशिवरात्रीनिमित्त सर्व स्थरातील भाविकांनी पहाटेपासून रात्रीपर्यंत मंदिरात शिवलिंगाचे दर्शन घेतले. दरम्यान, पूजा, अभिषेक, नवस फेडणे, विविध धार्मिक कार्यक्रम पार पाडले. तसेच 18 गाव भुवनेश्‍वर मंदिर समिती अध्यक्ष दीपक पाटील व उपाध्यक्ष सर्व सदस्य पदाधिकारी यांनी महाशिवरात्रीनिमित्त संगीत भजनाचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते. त्याचप्रमाणे खारेपाट विभागातील फोफेरी, हाशिवरे, मानकुळे हायस्कूलचे इयत्ता दहावी, बारावी प्रथम व द्वितीय व 18 गावांतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात 80 टक्क्यांवरील सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव भुवनेश्‍वर समितीच्या हस्ते करण्यात आला.

हरिहरेश्‍वर येथे पालखी सोहळा
श्रीक्षेत्र हरिहरेश्‍वर येथील महाशिवरात्री उत्सवातील पालखी सोहळ्यातील मानाची प्रथम पूजा श्रीवर्धनचे उपविभागीय अधिकारी अमित शेडगे व तहसिलदार सचिन गोसावी यांच्या हस्ते दि.17 फेब्रुवारी रोजी विधिवत करण्यात आली. यावेळी सरपंच खोत, सदस्या स्मिता पोवार, श्री कालभैरव जयंती उत्सव ट्रस्टचे कार्यवाह जगदीश कुलकर्णी, हरिहरेश्‍वर पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोलथरकर, मंडळ अधिकारी देऊळगावकर, तलाठी भामरे, अकोल्याचे व्यावसायिक निलेश बागाईत, तसेच संस्थेचे अध्यक्ष वामन बोडस, उपाध्यक्ष रमेश उळे, विश्‍वस्त निनाद गुरव, जितेंद्र गुरव, प्रफुल्ल लिडर, सचिव खजिनदार सिद्धेश पोवार आदी मान्यवर होते.

तालुक्यातील शिवमंदिरे भक्तांनी गजबजली
कर्जत तालुक्यात भक्तांनी शिव मंदिरात गर्दी केली होती.शिव मंदिरात धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. उल्हास, चिल्लार, पेज या तीन नद्यांच्या संगमावर असलेल्या कोल्हारे येथील श्री क्षेत्र संगमेश्‍वर येथे शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी हजारो शिवभक्त उपस्थित होते.त्या ठिकाणी मध्य रात्री बारा वाजता मंदिर दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. दरम्यान, दिवसभर भजन, कीर्तन, प्रवचन तसेच विविध सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नेरळ परिसरातील निर्माणनगरी तसेच बेकरे,आंबिवली,धामोते येथील धनेश्वरी,शेलू,देवपाडा पोषीर, येथील शिव मंदिर,पाषाने येथील शिव मंदिर, बेडीसगाव येथील शिव मंदिर,पोही,बिरदोले आणि चांधई येथील शिव मंदिर तसेच वारे येथील शिव मंदिर,कशेळे,खांडस,सालवड, पुरातन तमनाथ तसेच पोसरी येथील तलावात असलेले शिव मंदिर येथे अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत.

मानिवली येथील पुरातन शिव मंदिर आणि वैजनाथ येथील पुरातन शिवमंदिर येथे महाशिवरात्री निर्मित यात्रा भरली होती. माथेरान येथील शिव मंदिर आणि पिसारनाथ मंदिर येथे भक्तांनी मोठी गर्दी केली होती. नेरळ येथील ब्रम्हकुमारी यांच्या वतीने महाशिवरात्री मेळा करण्यात आला होता. तर मिरकुटे यांच्या खासगी मंदिरात धार्मिक कार्यक्रम आयोजित केले गेले होते.कर्जत शहरातील ग्रामदैवत कपालेश्‍वर मंदिरात दोन दिवस धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल सुरू असून मुद्रे येथील शिव मंदिरात भक्तांनी गर्दी केली होती.

माथेरानमध्ये महादेवाचा जयघोष
येथील स्वयंभू महादेवाचे देवस्थान असलेले पिसारनाथ मंदिरात भाविकांनी हर महादेवाचा जयघोष करीत मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.येथे दरवर्षी महाशिवरात्रीला भाविक मोठ्या संख्येने येत असतात. निसर्गाच्या सान्निध्यात शारलोट तलावाच्या बाजूला प्राचीन काळापासून हे स्वयंभू शंकराचे मंदिर वसलेले आहे. हे माथेरान धील जागरूक देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. महाशिवरात्री निमित्ताने सकाळ पासून येथील स्थानिक नागरिकांसह येथे येणार्‍या पर्यटकांनीसुद्धा दर्शनासाठी गर्दी आपल्या मनोकामना ग्रामदैवताकडे कथन केल्या. नवसाला पावतो अशी या दैवताची ख्याती आहे त्यामुळे अनेकजण येथे नवस बोलण्यासाठीसुद्धा आवर्जून हजरी लावतात.त्याच बरोबर पंचवटी नगर परिसरातील महादेवाच्या मंदिरातदेखील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. आणि महात्मा गांधी मार्गावरील शिवमंदिर येथे सुद्धा भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती. महाशिवरात्री दिवशी या मंदिरात येणार्‍या प्रत्येक भाविकांसाठी ग्रुपच्या वतीने प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. यानिमित्ताने यावेळी गावातील मान्यवर लोकप्रतिनिधी, नागरिक तसेच शनिवार विकेंड असल्याने येणार्‍या पर्यटकांनीदेखील आपल्या कुटुंबासहित दर्शनाचा लाभ घेतला. सायंकाळी महाआरतीचे आयोजनदेखील करण्यात आले होते.

चिर्ले येथे धार्मिक कार्यक्रम
चिर्ले येथील शिव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त गोयल परिवाराकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनाने महाशिवरात्रीचा सण उत्सहात झाला. दि.17 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजता जागरण व भजन, कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. शनिवार दि. 18 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री दिवशी सकाळी 6 वाजता रुद्रभिषेक, सकाळी 8 वाजता हवन व पूर्णाहुती, सकाळी 8 वाजल्यापासून दर्शनासाठी आलेल्या शिव भक्तांसाठी गोयल परिवारा कडून फलाहार व भोजन प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सुधीर शिवचरण गोयल, मोहित गोयल, रुपाली गोयल, उर्मिला कुमार, लोकेश गर्ग, अचल गर्ग, जगदीश अग्रवाल, प्रीतम मुंबईकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष नीलकंठ घरत आदींसह हजारो शिवभक्तांनी श्रीशंकराचे दर्शन घेतले.

शिवशंभो मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रम
पेण तालुक्यातील कुरनाड येथील शिवशंभो मंदिरामध्ये दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी लघुरुद्र, अभिषेक घालून शिवपिंडाची विधीवत पूजा करण्यात आली. त्याचप्रमाणे मंदिरासमोर छोटी-मोठी खेळण्यांची, मिठाईची दुकाने लावण्यात आली होती. त्यामुळे या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातील लहान ते थोरांपासून खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. तसेच रात्री जागर म्हणून भजन मंडळ कुरनाड यांच्या भजनाच्या आयोजनदेखील करण्यात आले होते.

Exit mobile version