मविआमुळे प्रकल्पग्रस्तांचे मुलभूत प्रश्‍न निकालात

पनवेलच्या नेत्यांचा दावा, सरकारला पाठिंबा
। पनवेल । प्रतिनिधी ।
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास दिवंगत दि.बा.पाटील यांचे नाव व गरजेपोटी बांधलेल्या घरांचा प्रश्‍न महाविकास आघाडीने निकाली काढला असून, त्यामुळे राज्यातील ठाकरे सरकारच्या मागे पनवेलमधील महाविकास आघाडी ठामपणे मागे राहणार असल्याचे मविआच्या नेत्यांनी जाहीर केले.

नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास दिवंगत दि.बा.पाटील यांचे नावे तसेच सिडको परिसरातील असलेला गरजेपोटी बांधलेल्या घरांचा प्रश्‍न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निकालात काढल्याबद्दल बुधवारी( 29 जून) पनवेल येथील शेकाप कार्यालयात पनवेल-उरण महाविकास आघाडीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत या आघाडीचे अध्यक्ष बबनदादा पाटील यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

या बैठकीला आ.बाळाराम पाटील, माजी आम..मनोहर भोईर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, जिल्हाध्यक्ष आर.सी.घरत, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, महाविकास आघाडीचे सचिव सुदाम पाटील, मा.नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेवक व सहसचिव गणेश कडू, उपाध्यक्ष काशिनाथ पाटील, नारायणशेठ घरत, दिपक घरत, योगेश तांडेल, ज्ञानेश्‍वर बडे, हेमराज म्हात्रे यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना बबनदादा पाटील यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांसोबत दोन दिवसापूर्वी भेट घेेवून ही आम्ही मागणी त्यांच्याकडे केली असता दोन समाजातील भांडणे मिटणार असतील व समाज एकत्र येत असतील तर आपला कधीच नावाला विरोध नव्हता, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित शिष्टमंडळाला सागून दिवंगत दि.बा.पाटील यांच्या नावाला दुजोरा दिला आहे. आता फक्त काही औपचारिकता बाकी राहिली असून या नावाला एकमुखाने मान्यता मिळून तो प्रश्‍न आता दिल्ली येथे पाठविण्यात येईल. यावेळी आम्ही सर्वांच्या सोबतीने सदर नाव लागण्यासाठी दिल्लीत जावून पाठपुरावा करू असे त्यांनी सांगितले.

यावेळी आ.बाळाराम पाटील यांनी सुद्धा सदर प्रश्‍नासाठी केलेल्या पाठपुराव्याची माहिती व महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळींनी एकत्रितपणे येवून हा पाठपुरावा केल्याने आज हा प्रश्‍न निकाली निघाल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी हे दोन्ही प्रश्‍न सातत्याने बबनदादा पाटील यांनी शासन दरबारी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडून सातत्याने या प्रश्‍नाची तड लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्यामुळेच अखेरीस यश मिळाले आहे. याबद्दल बबनदादा पाटील यांचे अभिनंदन करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Exit mobile version