‘इंडिया’ चा प्रचार जोमात

शेलू पंचायत समिती गणामध्ये घरोघरी कार्यकर्ते पत्रके देण्यात गुंतले


। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी चार पक्षांचे कार्यकर्ते यांनी जिल्हा परिषद प्रभागाप्रमाणे प्रचाराला सुरुवात केली. प्रत्येक ग्रामपंचायतीमधील प्रत्येक घरात जाऊन महाविकास आघाडीमधील घटक पक्षाचे कार्यकर्ते यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. शेलू पंचायत समिती गणामध्ये महाविकास आघाडी मधील घटक पक्ष शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेलू, दामत आणि ममदापुर गावामध्ये प्रत्येक मतदाराच्या घरात पोहचून उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांची पत्रके देऊन मतदान करण्याचे आवाहन केले.

मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचाराची सुरुवात (दि.25) एप्रिल पासून झाली. शेलू पंचायत समिती गणापासून महाविकास आघाडी मधील सर्व घटक पक्ष यांचे पदाधिकारी यांनी शेलू येथील शिव मंदिरात प्रचार सुरु केला. त्यावेळी महाविकास आघाडी मधील सर्व चार पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. महाविकास आघाडी मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश टोकरे, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती नारायण डामसे, शेतकरी कामगार पक्षाचे तालुका अध्यक्ष श्रीराम राणे आदी प्रमुखांच्या हस्ते प्रचाराचा श्रीफळ वाढविण्यात आला.

Exit mobile version