महाबीज कंपनी करणार भात खरेदी

| चिरनेर । वार्ताहर ।

उरण तालुक्यातील मौजे चिरनेर येथील शेतकर्‍यांना महाबीज बियाणे उत्पादक संस्थेकडून, ग्रामबिजोत्पादन योजने अंतर्गत जया या भात पीक वाणाचे पायाभूत बियाणे उपलब्ध करून देण्यात आले होते. दरम्यान सदर महाबीज भात पिकांची पाहणी 18 ऑक्टोबर रोजी महाबीजचे विभागीय बीज प्रमाणीकरण बीज परीक्षक अधिकारी श्री. डीसोझा आणि श्री. तांदळे तसेच महाबीजचे अधिकारी सचिन पाटील, तालुका कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी विश्‍वनाथ ढवळ, कृषी सहाय्यक निखिल देशमुख, सुरज घरत व कृषी मित्र प्रफुल्ल खारपाटील या सर्वांनी शेतकर्‍यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन, भात पिकांची पाहणी केली होती.

या पाहणी दौर्‍यात महाबीज बियाण्यांच्या वापराबाबत शेतकर्‍यांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले होते. दरम्यान भातपिकांची कापणी मळणी करून शेतकर्‍यांनी धान्य घरी आणल्यानंतर, चिरनेर येथील श्री महागणपती सेंद्रिय शेतकरी गटामार्फत मंगळवार (29) महाबीज कंपनीच्या कृषी क्षेत्र अधिकारी प्राची मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली चिरनेर ग्रामपंचायत कार्यालयात बीजोत्पादनाचा कार्यक्रम राबविण्यात आला.

यावेळी प्राची मोराळे यांनी महाबिजच्या पायाभूत बियाण्या विषयी आपला अनुभव कथन केला. यात महाबीज कंपनी शेतकर्‍यांना सरकारी हमी भावापेक्षा 20 टक्के जादा दर म्हणजे प्रतिक्विंटला अंदाजे 2473 हा भाव देऊन भाताची खरेदी करणार असल्याचे सांगून, शेतकर्‍यांनी 41 किलोच्या वजनाप्रमाणे भाताच्या गोणी भरून ठेवाव्यात, दोन दिवसात भात उचलल्यानंतर शेतकर्‍यांच्या बँक खात्यात ताबडतोब पैसे जमा करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला प्रफुल्ल खारपाटील, कृष्णा म्हात्रे, दत्तात्रेय म्हात्रे,संजय पाटील, भास्कर ठाकूर, दामोदर मुंबईकर, हिराजी ठाकूर, हसूराम मोकल, दत्तात्रेय पाटील, रवींद्र ठाकूर, संताजी ठाकूर, सुनील ठाकूर, जनार्दन कोळी, समाधान पाटील तसेच अन्य शेतकरी उपस्थित होते.

Exit mobile version