रस्त्याची रुंदी कमालीची घटली
| महाड | प्रतिनिधी |
महाड औद्योगिक वसाहतीमधील विविध कंपन्यांच्या खासगी बसेसनी महाड शहराच्या मुख्य रस्त्यांवर जणू आपलेच साम्राज्य उभे केले आहे. दस्तुरी नाका ते भीमनगर या मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर या बसेसनी अनधिकृत पार्किंगचा विळखा घातला आहे. स्थानिक रहिवाशांना घराबाहेर पडणे ही मुश्कील झाले आहे. संपूर्ण रस्ताच या बसेसनी व्यापून टाकल्यामुळे साधी दुचाकी किंवा सायकल नेणेही आता जिकिरीचे बनले असून, पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
दस्तुरी नाका ते भीमनगर हा परिसर अत्यंत गजबजलेला आणि रहिवासी वस्तीचा आहे. मात्र, महाड एमआयडीसीमध्ये कामगारांची ने-आण करणाऱ्या खाजगी बसेसनी या संपूर्ण रस्त्याचा ताबा घेतला आहे. रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृतपणे उभ्या राहणाऱ्या या अवजड बसेसमुळे रस्त्याची रुंदी कमालीची घटली आहे. समोरून येणाऱ्या वाहनाला जागा मिळत नाही, परिणामी येथे दररोज वाहतूक कोंडी आणि किरकोळ अपघात होत आहेत. पोलीस प्रशासन एखाद्या मोठ्या नरसंहाराची किंवा भीषण अपघाताची वाट पाहत आहे का? असा जळजळीत सवाल स्थानिक रहिवासी विचारत आहेत.
पोलीस प्रशासनाचे मौन
गंभीर समस्येकडे पोलीस प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही या खाजगी बस चालकांवर कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. पोलिसांच्या या ढिम्म कारभारामुळे बस चालकांचे धाडस अधिकच वाढले असून, त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काच्या रस्त्याला स्वतःचे खासगी यार्ड बनवले आहे.
महाड एमआयडीसीच्या खासगी बसेसनी सामान्य जनतेला अक्षरशः वेठीस धरले आहे. रस्त्यावर अनधिकृतपणे बसेस उभ्या करून सर्वसामान्यांची अडवणूक केली जात आहे. जर पोलीस प्रशासनाने या बसेसला वेळीच आवर घातला नाही, तर आम्ही गप्प बसणार नाही. जनतेच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी मनसे रस्त्यावर उतरून आपल्या स्टाईलने तीव्र आंदोलन करेल आणि त्यानंतर होणाऱ्या परिणामांना सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल.
पंकज उमासरे
मनसेनेचे महाड शहर अध्यक्ष







