सावित्रीचे पाणीपातळी घटली तरी महाडला पुराची भीती कायम

आ. गोगावले यांच्याकडून महामार्गाची पाहणी
। महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते सावित्री नदीतील पाण्याच्या पातळीतही वाढ झाल्याने शहरात सखल भागात नदीचे पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सोमवारी संध्याकाळी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर नदीतील पाण्याची पातळी कमी झाली व नागरिकांनी सुटकेचा निश्‍वास सोडला, मंगळवारी सकाळपासून पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने शहरात पाणी येण्याची शक्यता निर्माण झाली होती, परंतु सावित्री नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली नसल्याने जनजीवन पूर्वपदावर आले आहे. त्याचप्रमाणे आ भरत गोगावले यांनी महामार्गाची पाहणी केली.

जुलै 2021 मध्ये आलेल्या महापुराच्या आठवणी आजही महाडकरांच्या मनामध्ये कायम आहे. सोमवारी पावसाचा जोर वाढल्यानंतर सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडताच शहरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले बाजार पेठेतील बहुसंख्य व्यापार्‍यांनी आपला माल सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केला. त्याचबरोबर अनेकांनी आपली वाहने मुंबई गोवा महामार्गावर सुरक्षित ठिकाणी उभी करून ठेवली आहेत. महामार्गावर काही ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे पाणी साचत होते तसेच महामार्गालगत असलेल्या गावातून पावसाचे पाणी साठल्याने अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरले याबाबत महाडचे आमदार भरत गोगावले यांनी संबंधित अधिकार्‍यांसह महामार्गाची पाहणी करून योग्य त्या सूचना दिल्या.

महाड महाडमध्ये गेल्या 24 तासात 188 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे असे असले तरी सावित्री नदीतील पाण्याची पातळी कमी असल्याने दुपारपर्यंत पाणी येण्याची शक्यता कमी होती, परंतु दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सकाळपासून तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाचा जोर वाढल्याने गांधरी, काळ, नागेश्‍वरी या नद्यातील पाण्याच्या पातळीमध्ये थोड्याफार प्रमाणात वाढ झाली शासनाने नदीकिनारी असलेल्या गावांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आले आहेत.

रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 143.80 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.01 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 696.64 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- अलिबाग-88.00 मि.मी., पेण-139.00 मि.मी., मुरुड- 116.00 मि.मी., पनवेल- 172.20 मि.मी., उरण- 146.00 मि.मी., कर्जत- 101.60 मि.मी., खालापूर- 135.00 मि.मी., माणगाव- 230.00 मि.मी., रोहा- 107.00 मि.मी., सुधागड-134.00 मि.मी., तळा- 245.00 मि.मी., महाड-188.00 मि.मी., पोलादपूर-169.00 मि.मी, म्हसळा-127.00 मि.मी., श्रीवर्धन- 81.00 मि.मी., माथेरान- 122.00 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 2 हजार 300.80 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 143.80 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 22.46 टक्के इतकी आहे.

Exit mobile version