अरे बापरे! आ.गोगावलेंबद्दल खा. तटकरे म्हणाले की…

। महाड । प्रतिनिधी ।
राज्यात सध्या हातचलाखी करणार्‍यांचे दिवस आले असून ते हातचलाखी करून जनतेला फसवत आहेत परंतु त्यांची ही फसवेगिरी आता फार काळ टिकणार नाही, अशी उपहासात्मक टीका खा.सुनील तटकरे यांनी आ.भरत गोगावले यांच्यावर केली.

महाडचे माजी आमदार कै. माणिकराव जगताप यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या लोकविकास सामाजिक संस्था महाड आयोजित महाड महोत्सव या 11 ते 19 जानेवारी दरम्यान रंगणार्‍या आनंद मेळाव्याचे खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी नवेनगर येथील नगरपालिका प्रांगणात उद्घाटन झाले. यावेळी तटकरे यांनी चौफेर मिश्किल टोलेबाजी करत उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे उडवून दिले.

यावेळी त्यांनी मला आयोजकांकडून कडाक्याची थंडी असल्यामुळे जॅकेट घालून येण्याची सूचना करण्यात आली होती. परंतु सध्या जॅकेटवाल्यांचा सुळसुळाट झाला असल्याने आणि प्रामुख्याने आपल्या महाड, पोलादपूर येथे हा सुळसुळाट जास्त असल्याने मी सध्या जॅकेट घालनेच सोडून दिले आहे,असा अप्रत्यक्ष मिश्किल टोला त्यानी आमदार भरत गोगावले यांचे नाव न घेता लगावला. त महोत्सवातील जादूच्या प्रयोगाच्या निमित्ताने सध्या हातचलाखी करणार्‍यांचे दिवस आले असून ते हातचलाखी करून जनतेला फसवत आहेत. परंतु त्यांची ही फसवेगिरी आता फार काळ टिकणार नाही. अशी फिरकी देखील त्यांनी यावेळी घेतली.डॉ. बावस्कर तुम्ही विंचूदंशावर जसे संशोधन केले तसे या सुळसुळाट व हातचलाखी करणार्‍यांवर काहीतरी संशोधन करा आणि पुढल्या वेळेस त्यांचा बंदोबस्त करा,अशी मागणी त्यानी बावस्कर यांच्याकडे केली असता सर्वत्र एकच हशा पिकला.

आपल्या भाषणात चौफेर टोलेबाजी करताना त्यांनी, पद्मश्री डॉक्टर हिम्मतराव बावस्कर, भाजपचे बिपिन म्हामूनकर यांची देखील फिरकी घेतल्याने उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ माजला होता. यावेळी त्यांनी स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या अकाली निधनानंतर सुद्धा माजी नगराध्यक्षा सौ.स्नेहल जगताप-कामत यांनी वडिलांच्या दुःखामध्ये देखील महापुरात महाडकर जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याबद्दल त्यांचे खूप कौतुक केले. या दरम्यान कोरोना महामारीच्या कालावधीत महाड नगरपालिकेच्या सफाई कर्मचार्‍यांनी केलेल्या मानवतावादी कार्याचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.

व्यासपीठावर पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर, लोकविकासचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे वरिष्ठ नेते हनुमंत उर्फ नाना जगताप, श्रीमती पुष्पलता माणिकराव जगताप,महाड अर्बन बँकेच्या चेअरमन श्रीमती शोभाताई सावंत, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री महेंद्र घरत, बीजेपी दक्षिण रायगड उपजिल्हाध्यक्ष बिपिन म्हामुणकर, मनसे दक्षिण रायगड उपजिल्हाध्यक्ष चेतन उतेकर, प्रसिद्ध उद्योजक श्रीनिवास बेंडखळे, उद्धव ठाकरे शिवसेना संपर्कप्रमुख श्री अमित मोरे यांसह इतर मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक संदीप जाधव यांनी तर सूत्रसंचालन रंगसुगंधचे अध्यक्ष सुधीर शेठ यांनी केले. 11 ते 19 जानेवारी दरम्यान रंगणार्‍या या महाड महोत्सवामध्ये नागरिकांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम, ऑर्केस्ट्रा,खाद्य व विविध वस्तू विक्रीचे स्टॉल्स तसेच आकाश पाळणे, लहान मुलांच्या आवडीचे खेळ अशा पद्धतीची रेलचेल असल्यामुळे सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आनंद मेळ्याचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन लोकविकास सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version