महाड मल्लक कंपनी स्फोट प्रकरण : १३ जण जखमी; दहा किलोमीटरचा परिसर हादरला

| महाड | जुनेद तांबोळी |

महाड औद्योगिक वसाहतीमधील मल्लक स्पेशालिटी या कलर बनवणाऱ्या कंपनीमध्ये आज सकाळी दहा वाजता स्फोट होऊन आग लागल्याने संपूर्ण औद्योगिक क्षेत्र व आजूबाजूच्या गावात धुराचे लोट पसरून संपूर्ण परिसर प्रदूषित झाला. या स्फोटाची तीव्रता एवढी होती की, दहा किलोमीटरचा परिसराला त्याचा फटका लागला. या स्फोटामध्ये कंपनीत काम करणारे १३ कामगार गंभीर जखमी झाले आहेत.


रायगड जिल्ह्यातील महाड औद्योगिक वसाहतीमधील मल्लक स्पेशलिटी सी-103 या प्लॉटमध्ये कार्यरत असणाऱ्या मल्लक कंपनीमध्ये कलर बनवण्याचे उत्पादन घेतले जाते. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास या कंपनीत पहिला स्फोट झाला. त्यानंतर पाठोपाठ पाच स्फोटांनी संपूर्ण परिसर व आजूबाजूची चार गावे हादरून गेली. संपूर्ण एमआयडीसीमध्ये धुराचे लोट व आगीच्या ज्वालांनी संपूर्ण एमआयडीसीत काळा धूर पसरला होता. मल्लक स्पेशालिटी या कंपनीच्या बाजूला असणाऱ्या जिते, टेमघर, देशमुख कांबळे, बिरवाडी, नागलवाडी फाटापर्यंत एवढेच काय तर महाड शहरापर्यंत या स्फोटांनी रहिवासी क्षेत्रात मोठे हादरे बसले.


महाड औद्योगिक वसाहतीमधील मल्लक स्पेशलिटी या कंपनीत झालेल्या महाभयंकर स्फोटामुळे संपूर्ण परिसर प्रदूषित झाला असून महाड एमआयडीसीमधील पोलिसांनी व प्रशासनाने आजूबाजूच्या गावांचे रस्ते पूर्णपणे बंद केले आहेत. केमिकलच्या पांढऱ्या धुराने नागरिकांचे कपडे तर प्रदूषित झालेत व शरीरावर निळ्या कलरचे आच्छादन पसरले होते. या धुरामुळे व हवेतील प्रदूषणामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास मोठ्या प्रमाणावर जाणवू लागला आहे; तर अनेकांच्या तोंडाची चव या स्फोटामुळे गेली आहे.


उद्योग मंत्री व पालकमंत्री अपयशी?
राज्यातील ईडी सरकारमधील राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यापासून आज पाच महिन्याचा कालावधी लोटला. या काळात केवळ महाड एमआयडीसीमधील औद्योगिक वसाहतीमध्ये प्रिव्ही, श्रीहरी, लक्ष्मी ऑरगॅनिक, प्रसोल या कंपन्यांमध्ये मागील काही दिवसात स्फोट झाले होते. त्याची दखल उद्योग खात्याने पर्यायाने औद्योगिक सुरक्षा यंत्रणा यांनी घेतली नाही. त्यामुळे आज मल्लक स्पेशालिस्ट कंपनीत झालेला महाभयंकर स्फोट हे त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

सामंत रायगडचे पालकमंत्री की अलिबागचे?
राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे रायगडचे पालकमंत्री झाल्यापासून आज पाच महिन्याचा कालावधी लोटला. रायगड जिल्ह्यात 15 तालुके कार्यरत असताना मात्र त्यांनी केवळ अलिबाग येथेच अधिकाऱ्यांच्या भरोशावर राहून बैठका पार पाडल्या आहेत. त्या ठिकाणी भेट देणारे व उपस्थित असणारे अधिकारी केवळ थातूरमातूर उत्तरे देऊन पालकमंत्र्यांची दिशाभूल करतात. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात नक्की काय चालू आहे, याची इत्यंभूत माहिती प्रशासनाला पर्यायाने पालकमंत्र्यांना देत नसल्याने ग्रामीण भागातील नागरिक हैराण झाले आहेत.

केवळ आढावा बैठक घेऊन सोपस्कार पार पाडत असल्याने सर्व अधिकारी व प्रशासन मुजोर झाल्याची चर्चा संपूर्ण रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात नागरिकांकडून ऐकण्यास मिळत आहे. महाड औद्योगिक वसाहतीमधील मल्लक स्पेशालिस्ट कंपनीत आज पाच स्फोट झाले. या स्फोटामुळे संपूर्ण जमीन भूकंपासारखी हादरली होती. रायगड जिल्ह्यातील महाड, तळोजा एमआयडीसी मधील कंपन्यांमध्ये प्रदूषणाबाबत राज्याचे उद्योग मंत्री गांभीर्याने घेत नाहीत. त्याचाच परिणाम आजच्या महाड औद्योगिक वसाहतीमधील कंपनीत झालेल्या स्फोटाच उत्तम उदाहरण असल्याची चर्चा औद्योगिक वसाहत परिसरातील नागरिकांकडून यावेळी ऐकण्यास मिळाली.

महाड औद्योगिक वसाहती मधील कंपन्यांमध्ये कंपन्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी येणाऱ्या औद्योगिक सुरक्षा मंडळाचे अधिकारी हे कंपनी व्यवस्थापनाकडून पाकिटे घेऊन महाड मधील एका आलिशान हॉटेलमध्ये बसून आपला रिपोर्ट तयार करून सोपास्कार पार पाडत असल्याने औद्योगिक वसाहतीमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी काम करणाऱ्या अनेक कामगारांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे, हे आजच्या मल्लक कंपनीच्या स्फोटावरून स्पष्टपणे सिद्ध झाले आहे.

महाड औद्योगिक वसाहती मधील मल्लक कंपनीच्या स्फोटात मल्लक कंपनीबरोबर बाजूच्या प्रिव्ही ऑरगॅनिक, श्रीहरी केमिकल्स, केव्हा या कंपनीतील 13 जण गंभीर जखमी झाले असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे :- संतोष जाधव वय वर्षे 40, मोहन देशमुख वय वर्ष 43, निशांत जाधव वय वर्ष 28, भावेश बालकिया वय वर्ष 35, नितीन पाटील वय वर्ष 41, राम वय वर्ष 50, राजेश तिवारी वय वर्ष 60, सत्यरंजन पनराव वय वर्ष 26, सुनील काटे वय वर्ष 49, संदेश घरत वय वर्ष 44, अरुण इरळे वय वर्ष 38, शत्रुघन पास्वान वय वर्ष 25, अजित पासवान वय वर्ष 23. या व्यक्ती गंभीर जखमी असून यातील किरकोळ जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे, तर गंभीर जखमींना मुंबई येथे नेण्यात आले आहे

Exit mobile version