खड्डयांचे साम्राज्य, गाड्यांची दुरावस्था
। महाड । प्रतिनिधी ।
ऐतिहासिक महाड शहरातील एस.टी. बस स्थानकाची सध्या बिकट अवस्था असून आगारात सोईसुविधांचे तीनतेरा वाजले आहेत. बसेसची दुरवस्था, स्वच्छतागृहांमध्ये अस्वच्छता, रस्त्यावर पडलेले खड्डे, कचर्याचे साम्राज्य अशा समस्यांनी आगार ग्रासले आहे. येथील कर्मचारी विश्रामगृहात तर चालक वाहकांना नरकयातना सहन कराव्या लागत असल्याने या आगाराकडे कोणी लक्ष देईल का, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
नियोजनाचा अभाव आणि वरिष्ठ कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे बस स्थानकावर असलेल्या निवारा शेड, कर्मचारी निवासस्थान, बस प्रमुख कार्यालय यांची पुरती वाट लागली आहे. किल्ले रायगड, चवदार तळे येथे भेट देण्यासाठी प्रतिवर्षी लाखो पर्यटक, भीमसैनिक, शिवप्रेमी महाडमध्ये येत असतात. येथील गैरसोय पाहून प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

कोरोना काळात सर्वच बस बंद होत्या. त्यानंतर 2021 च्या पुरामध्ये महाड आगाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यात 60 बस पुराच्या पाण्यात खराब झाल्या होत्या. त्यामुळे ही वाहने बंद अवस्थेत होती. आज वर्ष उलटून गेले तरी या आगारात एकही नवीन बस आली नाही. तसेच ग्रामीण भागात गेलेल्या बस देखील बंद पडत असल्याने ग्रामीण भागातून ये-जा करणार्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
आगारातील कामगारांना आणि चालक वाहकांसाठी असलेल्या विश्रामगृहाची अवस्था बिकट झाली आहे. या ठिकाणी दर दिवस जवळपास 30 कर्मचारी आरामासाठी असतात. परंतु संपूर्ण इमारत गेली अनेक वर्षांपासून जैसे थे आहे.
प्रवासी शेडला गळती
अनेक वर्षांपासून ग्रामीण आणि लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी ऊन आणि पावसापासून वाचण्यासाठी आगारात अनेक शेड उभ्या आहेत. मात्र सध्या त्यांना गळती लागली आहे. याकडे सपशेल कानाडोळा केला जात आहे. परिणामी, प्रवाशांना बाहेर उभे रहावे लागत आहे. मूळ इमारत भक्कमपणे उभी असली तरी त्यावर डागडुजी केली जात नसल्याने परिसर आणि वाहक चालकांच्या विश्रामगृहांची अवस्था बघण्यासारखी आहे. या इमारतीच्या भिंतीवर उगवलेल्या रोपांनी वृक्ष बनण्याची वाट धरली आहे. याबाबत जिल्हा वाहतूक नियंत्रक अनघा बारटक्के यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.