महादेवाचा मुरा रस्त्याच्या कामाला गती

। पोलादपूर । वार्ताहर ।
पोलादपूर तालुक्यातील महादेवाचा मुरा या दूर्गम पर्यटनस्थळ असलेल्या महसूली गावाकडे जाणार्‍या रस्त्याच्या कामाला यंदा गती प्राप्त झाली असून साधारणपणे 3 कोटी 55 लाख 16 हजार 901 रूपयांच्या निविदा मंजूरीनंतर दोन ठेकेदारांना या रस्त्याचे कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. या कामात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सतत रखडपट्टी होत असल्याने आगामी पावसाळयापर्यंत या रस्त्याचे काम पूर्णत्वास जाण्याबाबत साशंकता निर्माण झाली होती. मुंबईकर ग्रामस्थ मिलींद पवार यांनी याप्रकरणी सातत्याने पाठपुरावा केल्याने या कामाला गती आणण्यासाठी प्रशासनावर आणि ठेकेदारावर मंत्रालय पातळीवरून आदेश झाल्याची माहिती प्राप्त झाली.

तालुक्यातील बोरघर आणि गोवेले या दोन ग्रामपंचायतीमध्ये विभागलेल्या महादेवाचा मुरा या महादेव कोळी समाजाची लोकवस्ती असलेल्या महसूली गावात रस्ता नेण्यासाठी माजी आ. माणिक जगताप यांनी 2010 पासून केलेले प्रयत्न कालांतराने अर्ध्यावर सोडून देण्यात आले होते. त्यानंतर गेल्या पावसाळयामध्ये महादेवाचा मुरा गावापर्यंत भगदाडं पडलेल्या रस्त्यावरून लोकवस्तीला अन्नधान्य व अन्य औषधोपचारासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्याने ग्रामस्थांची पायपीट सुरू झाली.

महादेवाचा मुरा येथील ग्रामस्थांनी पालकमंत्री अदिती तटकरे यांची मुंबई भेट घेऊन या गावाच्या रस्त्याची मागणी केली. गेल्या वर्षी महादेवाचा मुरा पर्यंत रस्त्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येऊन रस्त्यासाठी आर.के.चंदनानी यांनी 3 कोटी आणि पुलासाठी संजय अनिल शेठ यांना 55 लाख 16 हजार 901 रूपयांची निविदा मंजूर होऊन कार्यारंभ आदेश 23 डिसेंबर 2021 रोजी देण्यात आले. गेल्या चार महिन्यांपासून या कामाला गती प्राप्त न झाल्याने यंदाच्या पावसाळयातही रस्त्याचे काम रडतखडत सुरू राहिल्यास ग्रामस्थांची पायपीट कायम राहण्याची लक्षणे दिसून येत होती. यामुळे पवार याने नेहमीप्रमाणे पाठपुरावा करुन मंत्रालयस्तरावरून ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनावर दबाव आणून या कामाला गती प्राप्त होण्यासाठी प्रयत्न केले.

Exit mobile version