। महाड । प्रतिनिधी ।
महाड शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून येणार्या पुरावर शासनाकडून केल्या जाणार्या उपाययोजनांबाबत दिरंगाई केली जात असल्याने, महाडकर नागरिक अखेर आक्रमक झाले. शनिवारी सकाळी नागरिकांच्या वतीने येथील प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. महाड शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पूर येत असल्याने व्यापारी, त्याचबरोबर नागरिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. सन 2021 मध्ये शहरामध्ये प्रलयंकारी महापूर आल्याने प्रचंड आर्थिक नुकसान झाले. या महापुराच्या आपत्तीनंतर पूरपरिस्थिवर उपाययोजना करण्याबाबत शासनाकडून योग्य ते उपाय योजले जात नसल्याने आणि केल्या जाणार्या उपाययोजनांबाबत पुरेशी यांत्रिक साधने उपलब्ध होत नसल्याने शनिवारी नागरिकांनी स्थापन केलेल्या पूर निवारण समितीतर्फे प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये शहरातील हजारो नागरिकांचा सहभाग असल्याने शासनाकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत नागरिकांकडून तीव्र भावना व्यक्तकेल्या जात होत्या.
शहरातील पूरपरिस्थितीवर नियंत्रण आणण्याकरिता शासनाने योग्य ते उपाय योजावेत, अशी मागणी गेल्या सहा महिन्यांपासून नागरिकांकडून केली जात होती. शासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने शासनाचा निषेध व्यक्त करण्याकरिता मोर्चाचे आयोजन केले होते. त्याचबरोबर शहरातील व्यापार्यांनीदेखील आपली दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. महाड शहरातील नागरिक पूरपरिस्थिती उपायाबाबत आक्रमक झाले असून, नदीतील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झालेली असली तरी, या कामाला गती देण्याकरिता पुरेशी यंत्रणा उपलब्ध करुन देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाले असून, शासनाने नागरिकांच्या भावनेचा विचार करुन सुरु असलेल्या कामाला गती दिली नाही, तर पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा पूर निवारण समितीकडून देण्यात आला आहे.