| चिरनेर | दत्तात्रेय म्हात्रे |
महाराष्ट्रात व देशात आज अनेक पुरातन गणेश मंदिरे आहेत आणि त्यातून गणेशाची विविध गोजिरवाणी रुपे पहावयास मिळतात. उरण तालुक्यातील भक्ती, शक्ती व निसर्ग यांचा वरदहस्त लाभलेल्या ऐतिहासिक चिरनेर गावातील महागणपती गणेश मंदिर अद्याप सर्वदूर प्रसिद्ध पावले नसले, तरी त्यातील गणरायाच्या आगळ्यावेगळ्या व भव्य तसेच देखण्या रूपामुळे महाराष्ट्रात अष्टविनायकांनंतर हा गणपतीचा नावलौकिक पावला आहे.
चिरनेर येथील महागणपतीचे तीर्थस्थान हे पेशवेकालीन असून, महागणपतीची मूर्ती अत्यंत पुरातन असल्याचे दिसून येते. महागणपतीचे पूर्वीचे मंदिर तत्कालीन मुस्लिम आक्रमकांनी उद्ध्वस्त केले. मात्र, तत्पूर्वी भाविकांनी महागणपतीची मूर्ती मंदिराजवळच्या तलावात लपवून ठेवली होती. कालांतराने पेशव्यांचे सरदार रामजी महादेव फडके यांना महागणपतीने दृष्टांत दिल्यानंतर त्यांनी महागणपतीची मूर्ती तलावातून बाहेर काढून सध्याच्या या मंदिरात श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. आज गणपती असलेल्या पाड्याला मुळपाडा असे नाव दिसून येत असले, तरी ते पूर्वी मुळगाव होते.
पूर्वी परचक्राने उद्ध्वस्त झालेली गावे परत वसविली जात असत. तीन बाजूंना डोंगर व पश्चिमेला समुद्र असलेल्या सुरक्षित खोर्यात चिरनेर गाव वसलेले दिसून येते. चिरनेर परिसरात शिलाहार व यादव राजवटीत वसलेली गावे परकीय आक्रमणाने नामशेष झालेली आहेत. तळ्यातील गणपतीला दगडी चिर्यांच्या मंदिरात प्रतिष्ठापना करताना ज्यांचे योगदान लाभले ते पेशवेकालीन गणेशभक्त धन्य आहेत. यादव काळात गणेशपूजेला मोठे स्थान होते. पेशवे काळात गणपतीची अनेक मंदिरे निर्माण झाली. चिरनेर येथील या गणपतीच्या मंदिराची निर्मिती पेशवे बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांच्या कारकीर्दीत झाली. पेशवे कारकीर्दीत नानासाहेब पेशवे हे गणपतीला आपले आराध्य दैवत मानत. त्यांनी गणपती उत्सव सुरू केला. माघ उत्सवातील चतुर्थीला येथे श्री गजानन प्रत्यक्ष भोजनास येतात, अशी श्रद्धा असल्याने या दिवशी भक्तांची गर्दी असते. या दिवशी श्रींना महानैवद्य आणि त्याच दिवशी सर्व गणेशभक्तांना महाप्रसादाचा लाभ दिला जातो.
देवळाच्या निर्मितीने मुळगाव वसले. कोकणातील उरण व कर्नाळा प्रांताचा कारभार नानासाहेबांचे सुभेदार रामजीपंत फडके यांनी चालविला. हा कारभार सांभाळताना त्यांनी अनेक ठिकाणी मंदिरे उभारली. तसेच देवळांचा जीर्णोद्धार केला. चिरनेर येथील गणपती मंदिर हेमाडपंथीय धाटणीचे दिसून येते. आतील व बाहेरील रचनेवरून, पाषाणावरील कलाकुसरीचे मंदिराचे हे काम म्हणजे शिल्पकलेचा आणि वास्तुशास्त्राच्या बांधणीचा उत्कृष्ट नमुना आहे. अशा या पेशवे कारकीर्दीत बांधलेल्या मंदिरातील महागणपतीची मूर्ती आज बहुजन समाजाची आराध्य देवता झाली आहे. मूर्ती भव्य व पूर्वाभिमुख असून शेंदूर चर्चित आहे. श्रींच्या उजव्या हातात परशु आहे. तर दुसरा हात आशीर्वादाचा आहे. डावीकडील वरच्या हातात पाश, तर दुसर्या हातात मोदक आहे, डोक्यावर मुकुट दिसून येते.
चिरनेरचा हा गणपती डाव्या सोंडेचा म्हणजे तो रिद्धीविनायक आहे. पूर्वी या गणपतीला कौल लावण्याची पद्धत होती. माघ वद्य चतुर्थीला श्रींच्या जन्मोत्सवाचा कार्यक्रम होतो. चिरनेर येथील गणपती मंदिराच्या सभा मंडपाचा उपयोग चिरनेर जंगल सत्याग्रहातील आरोपींना बंदिस्त ठेवण्यासाठी केला होता. चिरनेर परिसरातील सामान्य जनतेने भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास घडविला, त्यामागे गणपतीची प्रेरणा होती.
संत रामदास हे चिरनेरला आले नाहीत. परंतु, त्यांची प्रेरणा चिरनेर गावापर्यंत पोहोचली. गणपती मंदिराजवळ कालांतराने हनुमान मंदिर निर्माण झाले. आज या महागणपतीवर केवळ गावातील नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपर्यातील गणेशभक्तांची श्रद्धा दिसून येते. चिरनेरच्या महागणपतीला पूजेचा अग्रमान देणारे असंख्य भक्तगण दिसून येतात. रायगड जिल्ह्यातील चिरनेर महागणपतीचा महिमा आज चारही दिशेला पसरला आहे. कोणतेही कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी अनेक भाविक आज चिरनेरच्या श्रीक्षेत्राला भेट देतात. गणेशभक्तांच्या मनोकामना महागणपतीच्या दर्शनाने पूर्ण होतात. श्रींच्या चिरनेर क्षेत्राच्या भेटीने न जाणो तुम्हालाही रिद्धी-सिद्धी प्राप्त होईल.