जिल्हाधिकार्यांच्या आवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसाद; रॅलीच्या माध्यमातून गावांमध्ये मतदान जनजागृती
। अलिबाग। प्रमोद जाधव ।
जिल्हाधिकारी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अलिबाग तालुक्यातील महाजने येथील रायगड जिल्हा परिषद शाळेने मताधिक्य वाढविण्यासाठी पुढाकार घेतला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत गावामध्ये मतदान जनजागृती म्हणून गावामध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले.
रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकिय यंत्रणा कामाला लागली आहे. येत्या 7 मे रोजी मतदान होणार आहे. रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी वेगवेगळ्या यंत्रणेला आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला जिल्ह्यातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जिल्ह्यात गावे, वाड्यांमध्ये जाऊन मतदारांशी संपर्क साधून मतदानाचे महत्व पटवून देण्याचे काम केले जात आहे. अलिबाग तालुक्यातील महाजने येथील रायगड जिल्हा परिषद शाळेनेदेखील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून आले. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून गावामध्ये जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर गावातून मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. मतदानासाठी वेळ काढा आपली जबाबदारी पार पाडा, आद्य कर्तव्य भारतीयांचे पवित्र कार्य मतदानाचे अशा घोषणा देण्यात आल्या. रॅलीमध्ये शाळेतील मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समिर पाटील, शिक्षण तज्ञ विठोबा खानावकर, मुख्याध्यापक सुशीला सांदणकर, शिक्षक जनार्दन शेळके, अंतरा पारंगे, प्रतिक्षा पाटील तसेच विद्यार्थी उपस्थित होते. महाजने येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये राबविलेल्या या उपक्रमाचे वेगवेगळ्या विभागाकडून कौतूक करण्यात आले.