चौल बेलाई येथील महाकाली माता

| रेवदंडा । वार्ताहर ।

प्राचीन चौल व्यापारी बाजारपेठ म्हणून प्रसिध्दीस असून येथूनच समुद्रखाडीमार्गे देशविदेशात व्यापार सुरू होता. ऐतिहासिक काळात प्राचीन चौलचा अन्ययसाधारण महत्व असून वैभवशाली अशी ओळख सांगितली जाते. व्यापार उदीमाने येथे अनेक समाज, जातीचे लोकांचे बस्तान होते. त्यापैकी त्वष्टा कासार समाजाचा उल्लेख करावा लागेल, या समाजाचे इतिहासकालीन साक्षीदार असलेले चौल बेलाई नजीक महाकाली माता मंदिर हे जागृत देवस्थान पहावयास मिळते.

अलिबागहून 18 किमी अंतरावर चौलनाका येथून दोन किमी अंतरावर डोल समुद्र नावाच्या तलावानजीक चौल बेलाई पाखाडीकडे जाणाऱ्या रस्त्यात कालीका टाकी नजीक महाकाली मातेचे प्राचीन मंदिर आहे. प्राचीनकाळी कुंडलिका खाडीचे पाणी थेट मंदिरासमोर येत होते व तेथूनच होडयाने येथील व्यापार चालत असावा असे सांगितले जाते. सभोवार व्यापारी पेठ असावी व या पेठेत कासार समाजाची माणसे वास्तव्य करीत असावी या कासार समाजाच्या मोठया प्रमाणात व्यवसाय असावा. त्यानीच मोठया भक्तीभावाने या मंदिराची उभारणी केली असावी. कालातंराने येथील कासार समाज सर्वत्र स्थलातंरीत झाला पण मंदिराचे मालकी हक्क आजही त्वष्टा कासार समाज ज्ञाती बांधव रेवदंडा यांचेकडे आहे. रेवदंडा येथील त्वष्टा कासार समाजाचे वतीने मंदिराचे व्यवस्थापन व धार्मिक विधी आदी कार्य पाहिले जातात. पुर्वी कालिका मंदिराच्या वाडीतून परिसरातील गुंराना पिण्यासाठी टाकीत सोडले जात होते म्हणून या परिसरात कालिका टाकी असे म्हटले जाते.

या मंदिराचा जिर्णोध्दार त्वष्टा कासार ज्ञाती संस्थान समाज रेवदंडा यांनी जीर्णोध्दार समिती नेमून 25 मे 1986 साली सुरू केले. तब्बल 14 वर्षानी या कामाची पुर्तता होऊन वैशाख शुध्द एकादशी 14 मे 2000 रोजी अदयावत स्वरूपाचे सिमेंट क्रॉकिटचे बांधलेले देखणे मंदिर समाजाला अर्पण करण्याचा भव्य सोहळा संपन्न झाला.

Exit mobile version